‘इ.व्ही.एम्. हॅकिंग’ (मतदान यंत्र) प्रश्नावर राजकीय पक्षांचा गोंधळ !

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

(टीप : ‘हॅकिंग’ म्हणजे एखाद्या प्रणालीमधील (जसे संगणक, नेटवर्क, स्मार्टफोन) उणिवा शोधून विनाअनुमती चोरून माहिती मिळवणे.)

१. सर्वोच्च न्यायालयात याचिका

‘इ.व्ही.एम्.’ हा विषय भारतात अनेक दिवसांपासून चर्चिला जात आहे आणि त्याविषयी अनेकदा न्यायालयात याचिकाही प्रविष्ट झाल्या आहेत. ‘इ.व्ही.एम्.’चा निवडणुकीत वापर न करण्यासंदर्भात ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक ‘इ.व्ही.एम्. हॅकिंग’ (मतदान यंत्र) रिफॉर्मस’ या संघटनेने निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. त्यात ‘इ.व्ही.एम्.’च्या माध्यमातून मतदान न घेता पारंपरिक पद्धतीने मतदान घेण्यात यावे’, अशी मागणी केली. प्रत्येक लोकसभा निवडणुकीनंतर बहुमत न मिळालेला प्रत्येक पक्ष त्याच्या पराभवाचे खापर ‘इ.व्ही.एम्.’वर फोडतो; मात्र सत्तेत आलेल्यावर हेच पक्ष त्याचे श्रेय ‘इ.व्ही.एम्.’ला देण्याचे नाकारतात. याचिकाकर्त्यांने सर्वोच्च न्यायालयात ‘इ.व्ही.एम्.’चा लाभ सत्ताधार्‍यांना होत असल्याने ती बंद करा’, असे सांगितले. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण चालू असतांना ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रकांतर्गत ‘इ.व्ही.एम्.’ची चाचणी घेण्यात आली. तेव्हा या यंत्राला ‘हॅक’ करणे अशक्य असून ‘ज्याला मतदान केले, त्यालाच मतदान पोचते’, असे लक्षात आले.

‘इ.व्ही.एम्.’

‘इ.व्ही.एम्.’ला ‘नेटवर्क’ इंटरनेट जोडलेले नसते. त्यामुळे ते सुरक्षित आहे. मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे रवींद्र वायकर यांचा केवळ ४७ मतांनी विजय झाला, तेव्हाही ‘इ.व्ही.एम्.’विषयी शंकांना जोर चढला होता. तेव्हा मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी म्हणाल्या, ‘‘मतदान यंत्र ‘अनलॉक’ करण्यासाठी भ्रमणभाषसंचावर ‘ओटीपी’ येत नाही. कोणत्याही प्रकारचे ‘हॅकिंग’ किंवा फेरफार करता येत नाही.’’ मुळात हा सगळा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयाने ऐकला. त्यानंतर ‘इ.व्ही.एम्. हॅकिंग’चा आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आणि ‘इ.व्ही.एम्.’च्या माध्यमातूनच मतदान करणे सुरक्षित आहे’, असा निवाडा दिला.

इलॉन मस्क

२. इलॉन मस्क बोले आणि भारतीय नेते डोले !

‘टेस्ला’चे इलॉन मस्क ‘इ.व्ही.एम्.’विषयी शंका उपस्थित करतांना म्हणाले, ‘मानवी किंवा कृत्रिम बुद्धीमत्ता (‘एआय’)द्वारे ‘इ.व्ही.एम्. हॅकिंग’चा धोका असतो. हा धोका अल्प असला, तरीही या यंत्राचा वापर बंद करायला हवा.’ माजी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी हा दावा फेटाळला. त्यांच्या  मते, हाच निकष अमेरिका किंवा अन्य देशांतही लावला जाऊ शकतो. इलॉन मस्क काही म्हणाले, तरी आपण सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, ते एक उद्योगपती आहेत. उद्योगपतीच्या वक्तव्यात व्यापारी खेळी दडलेली असते. त्यामुळे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे अपेक्षित होते. त्याच्या मोघम विधानावर विश्वास ठेवून ‘इ.व्ही.एम्.’विषयी शंका उपस्थित करणे, हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. त्यामुळे राहुल गांधी, अखिलेश यादव यांसारख्या अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इलॉन मस्क या धूर्त आणि चाणाक्ष उद्योगपतीच्या विधानाकडे दुर्लक्ष करायला पाहिजे होते; परंतु ‘मस्क बोले आणि भारतीय नेते डोले’, अशी भारतात स्थिती आहे.’

३. भारतात बनलेल्या ‘इ.व्ही.एम्.’ची अनेक देशांमध्ये निर्यात

आपल्या पराभवाचे खापर ‘इ.व्ही.एम्.’वर फोडणे, हे एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रावर संशय घेणे आहे. नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक पहाण्यासाठी ५० हून अधिक देशांचे प्रतिनिधी या अडीच मासाच्या काळात भारतात आले होते. त्यांनी निवडणूक प्रक्रिया समजून घेतली, तसेच देशात बनलेले ‘इ.व्ही.एम्.’ अनेक देशांमध्ये निर्यात करण्यात आले आहे. ते सदोष असते, तर चोखंदळ विदेशी लोकांनी विकत घेतले असते का ? हाही विचार करणे आवश्यक आहे. आपले नेते जी बाष्कळ बडबड करतात, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर होतो का ? याचाही विचार केला पाहिजे; कारण इतर देश हे आपले संभाव्य ग्राहक आहेत.                                (२१.६.२०२४)

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय