WB Defamation Case : बंगालच्या राज्यपालांकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला !

  • देशाच्या इतिहासात पहिलीच घटना !

  • ‘महिला राजभवनावर जाण्यास घाबरतात’, असे ममता बॅनर्जी यांनी केले होते विधान !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस

कोलकाता (बंगाल) – बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी कोलकाता उच्च न्यायालयात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे काही नेते यांच्या विरोधात मानहानीचा खटला प्रविष्ट (दाखल) केला आहे. देशात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांवर मानहानीचा खटला दाखल झाला आहे.  राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात अनेक दिवसांपासून वाद चालू आहे. काही महिलांनी आनंद बोस यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार केली आहे. याविषयी ममता म्हणाल्या होत्या, ‘‘महिलांनी माझ्याकडे तक्रार केली होती की, राजभवनातील कामकाजामुळे त्या तिथे जाण्यास घाबरत आहेत.’’

२ मे या दिवशी लोकसभा निवडणुकीच्या काळात राजभवनाच्या एका हंगामी महिला कर्मचार्‍याने राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप केला होता. ममता सरकारने या प्रकरणाचा तपास पोलिसांकडे सोपवला होता. त्याचवेळी राज्यपालांनी राजभवनात पोलिसांच्या प्रवेशावर बंदी घातली.

दुसर्‍या प्रकरणात देहलीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका ओडिसी पारंपरिक नृत्यांगनाने राज्यपाल बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता.

मला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र ! – राज्यपाल बोस

राज्यपालांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, ‘‘माझी अपकीर्ती करण्याचा हा कट आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. सत्याचा विजय होईल. मी खोट्या आरोपांना घाबरत नाही. माझी अपकीर्ती करून कुणाला निवडणुकीत लाभ मिळवायचा असेल, तर देव त्याचे भले करो. मी भ्रष्टाचार आणि हिंसाचार यांच्या विरोधातील लढा थांबवू शकत नाही.’’