संपादकीय : वाढते रेल्वे अपघात चिंताजनक !

दार्जिलिंग येथे झालेला रेल्वे अपघात

बंगालमधील दार्जिलिंग येथे १७ जून या दिवशी मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेसला मागून जोराची धडक दिल्याने या अपघातात १५ प्रवासी ठार, तर ६० जण घायाळ झाले आहेत. मालगाडीच्या लोकोपायलटने सिग्नलकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाल्याचा संशय आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असले, तरी हा अपघात मानवी चुकीमुळे घडल्याचे दिसून येते. वास्तविक रेल्वे ही सर्वसामान्य प्रवाशांची पहिली पसंती असणारी प्रवासी वाहतूक व्यवस्था आहे. देशभरात १ लाख किलोमीटरवर ‘रेल्वे ट्रॅक’चे जाळे आहे आणि प्रतिदिन अडीच कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळेच प्रवाशांचा रेल्वेवर कमालीचा विश्वास आहे. आता मात्र रेल्वेच्या सतत होणार्‍या अपघातांमुळे हा विश्वास अल्प होऊ लागला आहे.

रेल्वेच्या सुधारणेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च !

भारतीय रेल्वेला १८५ वर्षांचा इतिहास आहे. जगातील सर्वांत मोठी वाहतूक व्यवस्था म्हणून भारतीय रेल्वेचे नाव आहे. ‘तंत्रज्ञानातील सततच्या पालटामुळे कार्यक्षमता सुधारली आहे’, असे रेल्वे खाते म्हणत असले, तरी अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. प्रतिदिन लाखो लोक वाहतुकीसाठी रेल्वेवर अवलंबून असतात. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी तब्बल २.४० लाख कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ सहस्र २०० कि.मी.चे नवीन रेल्वेमार्ग तयार करण्यात आले. प्रतिवर्षी ८ सहस्र कि.मी. मार्गाचे नूतनीकरण होते. १०० कि.मी. प्रतिघंटा या वेगाने जाण्यासाठी रुळांचे आधुनिकीकरण केले जात आहे. काही मार्गांचे १३० कि.मी. प्रतिघंटा आणि काही वेगवान रेल्वेंसाठी (उदा. वन्दे भारत) १६० कि.मी. प्रतिघंटा वेगाने जाण्यासाठी रेल्वे रूळ सिद्ध केले जात आहेत.

प्रतिवर्षी १-२ रेल्वे अपघात !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून गेली ७५ वर्षे रेल्वेच्या अपघातांची साखळी तुटलेली नाही. अगदी वर्ष १९८१ मध्ये बिहारमध्ये झालेल्या अपघातात ७५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या अपघातांची तीच ती कारणे अनेकदा पुढे येऊनही त्याविषयी पुरेशा प्रमाणात सुधारणा होत नाही, हे या यंत्रणेचे अपयश आहे. तांत्रिक चुकीमुळे २ रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळण्यासारख्या घटना वारंवार घडणे, ही या यंत्रणेतील सर्वांत मोठी त्रुटी आहे. २ जून २०२३ या दिवशी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल एक्सप्रेसच्या झालेल्या अपघातात २७५ जणांचा मृत्यू, तर अनुमाने १ सहस्र लोक घायाळ झाले होते. एक एक्सप्रेस रेल्वे रुळावरून घसरून उलटली आणि ती दुसर्‍या बाजूने येणार्‍या रेल्वेला धडकली. ती जवळ असलेल्या मालगाडीला धडकली. असा हा विचित्र तिहेरी अपघात होता. आंध्रप्रदेशात २ रेल्वे गाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्याने झालेल्या भीषण अपघातात १०० प्रवाशांना जीव गमवावा लागला, तर ४० प्रवासी गंभीर घायाळ झाले. अशा पद्धतीने रेल्वेच्या भीषण अपघातांची मालिकाच चालू झाली आहे. यामध्ये निष्पाप प्रवाशांना जिवास मुकावे लागत आहे. जून २०२३ मध्ये बालासोरमध्ये ३ गाड्यांची टक्कर झाल्यानंतर अवघ्या २ महिन्यांनी म्हणजे ऑगस्ट महिन्यात उदयपूर-खजुराओ-द्रोणागिरी एक्सप्रेसला आग लागली. त्याच महिन्यात २६ जूनला मदुराई स्थानकावर उभ्या असलेल्या पूनलू-मदुराई एक्सप्रेसच्या खासगी कोचमध्ये सिलिंडरचा स्फोट होऊन १० जणांचा जळून मृत्यू झाला. रेल्वे मंत्रालयानेच दिलेल्या माहितीत वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेचे ४८ अपघात झाले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. जर एकाच वर्षात इतके अपघात होत असतील, तर रेल्वेच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच !

मानवी चुका कोणत्या ?

रेल्वेचे कर्मचारी जे रेल्वे आणि ट्रॅक यांची कार्यवाही, देखभाल आणि व्यवस्थापन यांसाठी उत्तरदायी आहेत, त्यांच्याकडून निष्काळजीपणा, भ्रष्टाचार किंवा सुरक्षा नियम आणि प्रक्रिया; चुकीचे सिग्नलिंग, सदोष संप्रेषण, अतीवेग, दोष किंवा धोक्यांकडे दुर्लक्ष या मानवी चुका होतात. रेल्वे कर्मचार्‍यांना पुरेसे प्रशिक्षण नसते आणि त्यांच्याकडे संभाषण कौशल्य नसते, ज्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर अन् समन्वय क्षमतेवर परिणाम होतो. ट्रॅकवरील रेल्वेचा वेग आणि दिशा नियंत्रित करणारी सिग्नल यंत्रणा तांत्रिक बिघाड, खंडित वीजपुरवठा किंवा मानवी चुका यांमुळे निकामी होऊ शकते. सिग्नल बिघाडामुळे रेल्वे चुकीच्या रुळांवरून जाऊ शकतात. गेल्या वर्षी ओडिशामध्ये झालेला रेल्वे अपघात हा ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’मधील पालटामुळे झाला होता. २ रेल्वेंची समोरासमोर टक्कर, रेल्वेच्या डब्यांना आग लागणे, रेल्वे रुळांना तडे जाणे, चालकाने सिग्नल तोडणे, गाड्यांचा अतीवेग आदी कारणांनी रेल्वे अपघात होतात, असे स्वतः रेल्वे खात्यानेच मान्य केले आहे. या अपघातांची कारणे रेल्वे खात्याला ठाऊक आहेत. रेल्वे खाते त्यावर उपाययोजनाही करत असेल. या मानवी चुका आहेत, तर त्यावर आणखी काय करता येईल ? असा विचार होणे अपेक्षित आहे.

उपाययोजना !

इतर देशांच्या रेल्वे यंत्रणांशी तुलना केली, तर भारत रेल्वेच्या सुधारणेत पुष्कळ मागे आहे. इतर देशांच्या पातळीपर्यंत पोचण्यासाठी भारताने त्याच्या पायाभूत सुविधा आणि सुरक्षा उपाय यांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मेट्रो आणि बुलेट रेल्वे यांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापूर्वी केंद्रशासनाने सध्याच्या चालू असलेल्या रेल्वेत मोठ्या प्रमाणात सुधारणा केली पाहिजे. अपुरी सुविधा, व्यवस्था, जुनीच कालबाह्य ठरलेली यंत्रणा, पुरेशा कर्मचार्‍यांची वानवा, आहे त्या कर्मचार्‍यांवर असलेला कामाचा ताण, भ्रष्टाचार, सुरक्षा नियमांकडे होणारे दुर्लक्ष आदी गोष्टींकडे रेल्वे खात्याने लक्ष द्यायला हवे. सरकारने रेल्वेला आवश्यक त्या पुरेशा सुविधा पुरवायला हव्या. अनेक वर्षे रखडलेली कर्मचार्‍यांची भरती रेल्वे खात्याने केली पाहिजे. जुनी आणि कालबाह्य यंत्रणा हटवून नवीन अद्ययावत यंत्रणांचा रेल्वे खात्याने वापर करायला हवा. रेल्वे अपघात टाळण्यासाठी ‘आर्.डी.एच्.ओ.’ने ‘अँटी कोलिजन डिव्हाईस’चा (टक्करविरोधी उपकरण) पर्याय दिला आहे. यात गाड्यांची टक्कर होत नाही. ही प्रणाली जी.पी.एस्. सिस्टीम (उपग्रहाद्वारे चालणारी यंत्रणा) आणि रेडिओ कम्युनिकेशन सेन्सरवर आधारित आहे. यांसारख्या अत्याधुनिक प्रणालींचा वापर केल्यास रेल्वेचे अपघात काही प्रमाणात टाळता येतील. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने या पर्यायांचा लवकरात लवकर वापर करावा !

रेल्वे खात्याने जुनी आणि कालबाह्य यंत्रणा हटवून नवीन अद्ययावत यंत्रणांचा वापर करून अपघात टाळावेत !