अवैध गोवंश तस्करीचे सखोल अन्वेषण करावे !

  • हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी !

  • सांगली येथे गोवंश पकडल्याचे प्रकरण !

सांगली, १ जून (वार्ता.) – सांगलीवाडीमधील कदमवाडी रस्ता येथे २८ मे या दिवशी रिक्शातून ६ वासरे कत्तलीसाठी घेऊन जात असतांना गोरक्षकांनी पकडली होती. अवैध वाहनातून निर्दयीपणे वाहतूक करत असतांना पोत्यात बांधलेला गोवंश पकडण्यात आला असला, तरी असे प्रकार वारंवार होत आहेत. त्यामुळे गोवंशियांची वाहतूक करणार्‍या अवैध वाहनांचे सखोल अन्वेषण करावे, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ३० मे या दिवशी अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेने’च्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गोरक्षकांनी दिलेल्या रीतसर तक्रारीची नोंद पोलिसांनी केली आहे. रिक्शाचालक वापरत असलेली रिक्शा (क्रमांक एम्.एच्.१० के ३३७४) ही वारंवार अवैध वाहतूक करतांना आढळून येते. या वाहतुकीच्या वेळी वाहनात आढळून आलेली अवैध शस्त्रे, तस्करीसाठी वारंवार होत असेलला रिक्शाचा वापर, तसेच धर्मांध रिक्शाचालक अहमद मुजावर यांसह संबंधित सर्व जणांचे कसून अन्वेषण करून तक्रारीत योग्य कलमांतर्गत पालट करावा, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे.

या वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उमाकांत कार्वेकर, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेने’चे संस्थापक अध्यक्ष विनायक येडके, महिलाप्रमुख सौ. राणीताई कमलाकर, रेखाताई गोसावी, कार्याध्यक्ष श्री. अभिमन्यू भोसले, सचिव धर्मेंद्र आबा कोळी, गोरक्षक सर्वश्री शिवतेज सावंत, ओंकार मासाळे, आर्यन वीर, आदित्य वीर, यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

अनेक वेळा गोवंशियांची अवैध वाहतूक केलेले वाहन परत परत सुटते कसे ?