संपूर्ण आयुष्यभर धर्मग्लानी दूर करणारी आणि धर्माला पुनर्तेज मिळवून देणारी महान विभूती : जगद्गुरु आद्यशंकराचार्य !

आज ‘जगद्गुरु आद्यशंकराचार्य यांचा कैलासगमनदिन’ आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

७-८ व्या शतकात भारतात धार्मिक अराजक माजले होते. विविध पंथांचे  पुरस्कर्ते व्यासपिठावरून अवैदिक धर्माची मीमांसा करू लागले. सनातन वैदिक धर्माचा पराजय करण्यासाठी झटू लागले. अवैदिकांचा सुळसुळाट झाला आणि खर्‍या धर्मावर गडद काजळी धरली. धर्माला ग्लानी आली. विधात्याने वैदिक धर्मावर आलेली काजळी दूर करून त्याला पुनर्तेज प्रदान करण्यासाठी केरळ प्रांतातील कालडी ग्रामात शिवगुरु आणि आर्याम्बा या दांपत्याच्या पोटी साक्षात् शिवावतार आद्यशंकराचार्य जन्मास आले !

जगद्गुरु आद्य शंकराचार्य

१. आद्यशंकराचार्यांच्या जन्माची पार्श्वभूमी आणि बालपण

आर्याम्बा आणि शिवगुरु यांना विवाहानंतर बरीच वर्षे लोटल्यावरही संतानप्राप्ती झाली नाही. त्यांनी भगवान शिवाची कठोर आराधना केली. शिवाने शिवगुरूंना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले, ‘तुम्हाला महाज्ञानी; परंतु अल्पायुषी पुत्र होईल आणि मी स्वतःच तुझ्या पत्नीच्या पोटी जन्म घेईन.’ त्याप्रमाणे जन्मलेला बालशंकर अत्यंत सुंदर, तेजस्वी आणि बुद्धीमान होता. वयाच्या ५ व्या वर्षीच तो वेदांगात पारंगत झाला. तो गुरुकुलातून परतल्यावर वडील शिवगुरूंची प्रकृती खालावून त्यांचे निधन झाले. तेव्हा बालशंकराने आईला गीतेतील तत्त्वज्ञान सांगून तिचे सांत्वन केले. ‘कालडी येथे शंकराचा अवतार झाला आहे’, ही वार्ता सर्वत्र पसरली होती. तेव्हा अनेक ऋषींचा समूह शंकराच्या या मानवी अवतारास भेटण्यासाठी येत. त्यांनी काही उपाय करून शंकराची आयुमर्यादा ८ वरून १६ वर्षे केली आणि त्याला अद्वैत मताचा प्रसार करण्याचा, तसेच लोकांना खरा धर्म शिकवण्याचा उपदेश केला.

२. शंकराच्या अवतारत्वाची प्रचीती देणार्‍या घटना

अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट

२ अ. शंकराने लक्ष्मीचे स्तवन करून ब्राह्मण स्त्रीचे दारिद्र्य दूर केले ! : एकदा शंकर भिक्षा मागण्यासाठी आल्यावर ब्राह्मण स्त्री घरातून बाहेर आली; पण ‘दारिद्र्यामुळे भिक्षा देण्यासाठी घरात काहीच नाही’, असे तिने सांगितले. शंकराने सांगितले की, घरात जाऊन शोध. काहीतरी सापडेल. तिला आवळा दिसला. तिने तो शंकराच्या झोळीत टाकला. शंकराने लक्ष्मीचे स्तवन केले. तिने प्रसन्न होऊन दर्शन दिल्यावर शंकराने ब्राह्मण स्त्रीचे दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रार्थना केली. लक्ष्मीने तिच्या घरावर सोन्याच्या आवळ्यांचा वर्षाव केला. शंकराने १८ श्लोक रचून लक्ष्मीचे केलेले स्तवन ‘कनकधारास्तोत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे.

२ आ. त्रिपुरसुंदरीदेवीने शंकराची इच्छा पूर्ण करणे : शंकराचे पिता शिवगुरु श्रीललितामहात्रिपुरसुंदरीच्या पूजेसाठी जात. तेव्हा शंकर ३-४ वर्षांचा होता. देवीला दुग्धस्नान घालून राहिलेले नैवेद्याचे दूध ते शंकराला पिण्यासाठी देत. ‘देवी दूध पिते आणि उरलेले दूध वडील आपल्याला देतात’, अशी त्याची समजूत होती. एकदा वडिलांना शक्य होणार नसल्याने शंकराने देवीसाठी दूध ठेवले; पण ते तसेच राहिले. त्याला रडू आले. शेवटी त्रिपुरसुंदरीला त्याची दया येऊन तिने दूध प्राशन केले; पण ‘आपल्यासाठी तिने थोडेही दूध ठेवले नाही’, असे वाटून तो रडू लागला. मग वात्सल्यमूर्ती देवीने त्याला स्तनपान करवले.

२ इ. मातेने संन्यास घेण्याची अनुमती देण्यासाठी घडलेला दैवी प्रसंग ! : आर्याम्बा शंकराला संन्यास घेण्याची अनुज्ञा देत नव्हती. एकदा तो सकाळी मातेसोबत पूर्णा नदीत स्नानाला गेला. पोहत आत गेल्यावर मगरीने त्याचा पाय धरला. आर्याम्बा अतीव शोक करू लागली. शंकर ओरडून म्हणाला, ‘‘आता तरी मला संन्यास घेण्याची अनुमती दे.’’ नाईलाजाने तिने अनुमती दिली आणि तेव्हाच मगरीने त्याचा पाय सोडला. अर्थात् हे सर्व दैवी नियोजन होते.

३. अशी झाली गुरु-शिष्यांची भेट 

यानंतर सद्गुरूंच्या शोधासाठी शंकराने दुसर्‍याच दिवशी सकाळी उत्तरेकडे प्रस्थान केले. गुरुकुलात असतांना त्याच्या गुरूंनी कित्येक वर्षांपासून नर्मदातिरी एका गुहेत वास्तव्यास असलेल्या समाधी लावून बसलेल्या तत्त्वज्ञ महायोगी गोविंदपाद यतींविषयी सांगितले होते. तेव्हाच शंकराने त्या यतीला मनोमन गुरु मानले होते. त्यांच्या शोधार्थ शंकर निघाला. वाटेत गोविंदयतींविषयी विचारत विचारत तो ओंकारनाथ या नर्मदातीरावरील क्षेत्री पोचला. तिथे एका गुहेत गोविंदयती समाधी लावून बसले होते. त्याने गुहेत जाऊन त्यांचे दर्शन घेतले, तेव्हा त्यांची समाधी अनेक वर्षांनी उतरली. गुरु-शिष्यांची भेट झाली. गोविंदपादांनी त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला. त्याच्याकडून साधना करवून घेतली. स्वतःकडील सर्व ज्ञान त्याला दिले. अनेक सिद्धी दिल्या. अपरोक्षअनुभूती दिल्या. शंकराला ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली. गोविंदपादांच्या अन्य शिष्यांनाही शंकराचा अधिकार कळला. गोविंदपादांनी शंकराला त्याच्या अवतारत्वाची जाणीव करून दिली. प्रथम काशीस जाऊन नंतर भारतभर भ्रमण करून वेदविरोधी मतमतांतरांना पराभूत करून वेदांताला सर्वोच्च स्थान मिळवून देण्याचीही आज्ञा केली.

४. काशीमध्ये अनेकांचा शंकराचार्यांकडून वादात पराभव !

गुर्वाज्ञेनुसार आचार्य शंकर काही संन्याशांना समवेत घेऊन काशीस निघाले. शंकराचार्यांशी वादविवाद करून त्यांना पराभूत करावे आणि आपले अनुयायी बनवावे, या उद्देशाने अनेक संप्रदायप्रमुख त्यांना भेटत; पण शंकराचार्यांकडूनच त्यांचा वादात पराभव होऊन ते त्यांचे शिष्य होत असत.

जगद्गुरु आद्य शंकराचार्य अद्वैत सिद्धांताचा मूलमंत्र !

आचार्यांनी ज्या अद्वैत सिद्धांताचा प्रचार केला, त्याचा मूलमंत्र ‘‘ब्रह्म सत्यं जगन्मिमिथ्या ।’ असा आहे. याचा अर्थ ‘ब्रह्म हेच खरे असून इतर सर्व मिथ्या म्हणजे खोटे आहे.’ ‘जग भ्रमात्मक आहे. जीव हा ब्रह्मच आहे. जीव ब्रह्माहून भिन्न नाही’, हे ४ सिद्धांत, म्हणजे अद्वैतवादाची आधारशीला आहे.

शंकराचार्यांनी केलेली मठांची स्थापना

पश्चिमेला द्वारका येथे शारदा मठ, पूर्वेला पुरी येथे गोवर्धन मठ, उत्तरेला बद्रिकाश्रम येथे ज्योतीर्मठ, दक्षिणेला रामेश्वर येथे शृंगेरी मठ ! या चार मठांच्या व्यतिरिक्त काशीचा सुमेर मठ आणि कांचीचे कामकोटी पीठ यांची निर्मितीही त्यांनीच केली.
– अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट

५. आचार्य शंकर आणि व्यासमुनी यांची भेट !

आचार्य त्यांच्या शिष्यांना अध्यापन करत असतांना साक्षात् वेदव्यास वृद्ध ब्राह्मणाच्या वेषात तेथे आले. त्यांनी ब्रह्मसूत्रांवर आधारित प्रश्न आचार्यांना विचारले. आचार्यांनी वेदव्यासांना ओळखले. त्यांचे स्तवन केले. व्यास त्यांच्यावर प्रसन्न झाले. आचार्यांनी लिहिलेली प्रस्थानत्रयी (ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, गीता) वरील भाष्ये त्यांनी चाळली आणि ‘अतीउत्तम’ म्हणून त्यांचा गौरव केला; परंतु आचार्यांनी स्वतःच्या देहत्यागाविषयी सांगितले, तेव्हा मात्र व्यासांनी त्यांना अजून त्यांचे भारतातील ‘दिग्विजय’, तसेच विद्वानांशी शास्त्रार्थ करून, त्यांना पराभूत करून ‘अद्वैतवादाचे पुरस्कर्ते’ हे कार्य शेष आहे, असे सांगितले. या कार्यासाठी त्यांचे आयुष्य देवांच्या आज्ञेने अधिक १६ वर्षे वाढवून देत असल्याचेही सांगितले. प्रयागनगरीत वास्तव्यास असणार्‍या जैमिनी मीमांसक कुमारील भट्ट या कर्मकांडी विद्वानाचा पराभव करण्यास सांगितले.

६. आचार्यांचा पुढील प्रवास

वेदव्यासांची आज्ञा शिरोधार्य मानून आचार्य पुढील प्रवासास निघाले. कुमारील भट्ट हे दिग्विजयी पंडित होते. त्यांचाही पराभव केला. त्यांनी आचार्यांना माहिष्मती नगरीत रहाणारा त्यांचा विद्वान शिष्य मीमांसक मंडनमिश्रा याची भेट घेऊन त्याला वादात पराभूत करण्यास सुचवले. आचार्यांकडून ‘ओम तत्सत्’ या वेदांतील महावाक्याची दीक्षा घेऊन कुमारील भट्टांनी देहत्याग केला. मंडनमिश्रा आणि त्याची विदुषी पत्नी, जी साक्षात् सरस्वतीदेवीचा अवतार होती, या दोघांचाही आचार्य शंकर यांनी वादात पराभव केला. ‘वादात जो पराभूत होईल, त्याने जिंकणार्‍याचे शिष्यत्व पत्करावे’, असे ठरले होते. त्यानुसार मंडनमिश्राने आचार्यांचे शिष्यत्व पत्करले. यानंतर आचार्य शिष्यांसह दिग्विजयासाठी बाहेर पडले. दिग्विजय यात्रेच्या निमित्ताने आचार्यांनी आपल्या शिष्यांसह तत्कालीन भारतवर्षात अव्याहतपणे भ्रमण केले. या वेळी त्या सर्वांनाच अनेक अग्निदिव्यांना सामोरे जावे लागले. त्यांच्यावर विषप्रयोग झाले. त्यांना जीवानिशी ठार मारण्याचे प्रयत्न झाले; पण त्या सर्व संकटांवर मात करत आचार्यांनी आपले ईप्सित कार्य पूर्ण केले.

अद्वैतवादाचा प्रसार करतांना विविध वैदिक संप्रदायांमधील मतभेद त्यांनी मिटवले. शुद्ध वैदिक धर्माचे बीज पेरले. आचार्यांनी सांप्रदायिकांना उपदेश केला,

अ. जोपर्यंत हे जग तुम्ही सत्य समजत आहात, तोपर्यंत या विश्वाचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्माचे ज्ञान तुम्हाला होणार नाही. आत्मज्ञान होणे, म्हणजेच मुक्त होणे होय. कर्म हा मोक्षाचा मार्ग नाही. जे कर्माने साध्य होते, त्याचा विनाश ठरलेलाच आहे. कर्माने शुचिता प्राप्त होईल; पण ती आत्मसिद्धी नाही. फलाशाविरहित कर्म करणे, हा कर्मयोग आहे.

आ. आपल्या आराध्याची सतत आणि निश्चल उपासना करणे, हा भक्तीयोग आहे.

इ. शिस्त, नियम पाळून एकाग्रता साधणे, हा ध्यानयोग आहे.

या तिघांचे आचरण साधले की, तुम्ही ज्ञानयोग साधण्याला अधिकारी व्हाल. ज्ञानाग्नी पेटल्यानंतरच आत्मबोध होईल !’

७. सर्वज्ञानपीठावर आरोहण !

आचार्यांचे आणखी एक कार्य शेष होते, ते म्हणजे सर्वज्ञानपीठावर आरोहण ! त्यासाठी त्यांनी राजसेनेला सर्वज्ञानपीठाची रचना करण्यास सांगितली. यानंतर त्यांची अवतारसमाप्ती होणार होती. त्यांनी प्रथेनुसार सर्वज्ञानपीठाच्या प्रत्येक पायरीवर शास्त्र, कला, वेद, विद्या यांत निष्णात पंडितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली अन् त्या प्रत्येकाची अनुमती घेऊन ते सर्वज्ञानपीठावर आरूढ झाले. तो दिव्य आणि अलौकिक क्षण होता. त्यानंतर एका सप्ताहानंतरच्या पहाटे उठून स्नान करून ते कामाक्षीच्या मूर्तीसमोरील ओट्यावर समाधी लावून बसले. निर्विकल्प समाधी अवस्थेतच त्यांचे पंचप्राण मस्तक भेदून गेले आणि तेजाचा एक लोळ कामाक्षीच्या मूर्तीत जाऊन स्थिरावला. अवघी कांचीनगरी शोकग्रस्त झाली. शतकानुशतकात एखाद्याच वेळी अवतार घेणारे अलौकिक व्यक्तीमत्त्व दृष्टीआड झाले. भाष्यलेखन, प्रचार, दिग्विजय, मठस्थापना इत्यादी कार्य आचार्यांनी अवघ्या ३१ वर्षांत पूर्ण केले. अशा या महान विभूतीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !

संकलक : अधिवक्त्या (श्रीमती) श्रुती भट, अकोला.  (११.५.२०२४)