गोव्यात शालेय स्तरावर वर्ष २०२७-२८ पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णत: लागू होणार

पणजी, २१ मे (वार्ता.)  – गोव्यात शालेय स्तरावर वर्ष २०२७-२८ पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णत: लागू होणार आहे. गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यंदाच्या वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ९ वीमध्ये लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांनी दिली आहे.

सचिव प्रसाद लोलयेकर पुढे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय शैक्षणित धोरण इयत्ता ३ री आणि इयत्ता ६ वीसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. वर्ष २०२७-२८ पर्यंत अभ्यासक्रमांमध्ये अपेक्षित पालट केल्यानंतर शिक्षण खाते शैक्षणिक संकुलांची ५+३+३+४ या तत्त्वावर पुनर्रचना करणार आहे. यासंबंधी अधिक माहिती ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.’’

इयत्ता ९ वीसाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका केंद्रीय स्तरावर सिद्ध करणार, तर मूल्यांकन शाळा स्तरावर होणार

सचिव प्रसाद लोलयेकर

सचिव लोलयेकर पुढे म्हणाले, ‘‘यंदा इयत्ता ९ वीला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणित धोरणात पूर्वीच्या शिक्षण पद्धतीनुसार पहिली, दुसरी आणि तिसरी भाषा, असे भाग असणार नाहीत, तर ३ भाषा घेता येतील. या तिन्ही भाषांना समान गुण असतील. या तीनमधील विदेशी भाषा म्हणजे इंग्रजी आणि अन्य २ कोणत्याही भारतीय भाषा घेता येणार आहेत. इयत्ता ९ साठी गोवा शालांत मंडळ केंद्रीय स्तरावर (सेंट्रलाईझड्) परीक्षेची प्रश्नपत्रिका सिद्ध करणार आहे, तर विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे शाळा स्तरावर होणार आहे. या वेळी अभ्यासक्रम दोन सत्रांचा असणार आहे.’’