डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यावर निखिल वागळे यांनी ‘ओरिजनल चॅनल’ या यू ट्यूब वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीच्या वेळी केलेली काही वक्तव्ये येथे प्रसिद्ध करत आहोत. नेहमीप्रमाणेच वागळे यांनी ‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या उक्तीनुसार विधाने करून सनातनद्वेष प्रकट केला आहे; परंतु दर्शकांची दिशाभूल होऊ नये म्हणून हे लिखाण येथे प्रसिद्ध करत आहोत.
१. न्यायालयाचा निकाल न पटणारे आणि त्याचा अवमान करणारे वागळे !
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील निकाल अतिशय निराशाजनक आहे, अशा शब्दांत निखील वागळे यांनी न्यायालयाच्या निर्णयावर टीका केली. या प्रकरणातील २ आरोपींना शिक्षा होणे, हे त्यांच्या सर्वांत खालच्या कडीतील लोकांना शिक्षा होण्यासारखे आहे आणि घटनेतील ‘मास्टरमाईंड’ (मुख्य सूत्रधार) निर्दाेष सुटणे म्हणजे ज्याने कट रचला त्याला मोकळीक दिल्यासारखे आहे. (याचा अर्थ ‘लोकशाहीतील न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही’, असेच वागळे यांना म्हणायचे आहे. स्वतःच्या मनासारखा निकाल झाला नाही, तर पटला नाही. त्यांच्या मनाप्रमाणे निकाल लागला असता, तर त्यांना तो पटला असता. – संपादक) ‘मास्टरमाईंड’ला शिक्षा का झाली नाही ? सीबीआयने जे आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले होते, त्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ डॉ. वीरेंद्रसिंह तावडे असल्याचे स्पष्ट होते. (आरोपपत्रात स्पष्ट होते, तर पुरावे का सादर केले नाहीत ? – संपादक)
‘डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याने ही हत्या घडवून आणली (अपकीर्तीकारक आणि खोटा आरोप न्यायालयाच्या निर्णयानंतर निखील वागळे करत आहेत, हा न्यायालयाचा अवमान नाही का ? – संपादक), तसेच शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांची भेट घेऊन त्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण दिले. यासमवेतच त्यांना हत्यारे पुरवण्याचेही काम केले आहे.’ शरद कळसकर यांच्या जबानीमध्ये ही सर्व योजना त्यांनी मांडली आहे. (आरोपींचा स्वीकृती जबाब हा न्यायालयासमोर व्हावा लागतो. तसा तो झालेला नाही, ही सीबीआयची त्रुटी न्यायालयाने स्पष्ट केली आहे. याकडे वागळे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी खोटे बोलण्यासाठी आरोपींवर दबावही टाकलेला असू शकतो, ही शक्यताच मोठी आहे. कायद्याच्या तत्त्वांनुसार एखाद्या कटातील आरोपींपैकी एका आरोपीने ‘इतरांनी मला असा गुन्हा करण्यास सांगितले’, या म्हणण्याला पुरावा मानता येत नाही. त्यामुळे केवळ एखाद्याच्या जबानीमधील स्वत:ला हवे ते सूत्र घेऊन निष्कर्ष काढणे, हा न्यायालयाचा अवमानच आहे ! – संपादक)
न्यायालयाने प्राथमिक निरीक्षणात म्हटले आहे की, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या भूमिकेविषयी शंका घ्यावी, अशा अनेक गोष्टी या आरोपपत्रात आहेत; परंतु हा संशय सिद्ध होण्याइतका पुरावा सीबीआयने दिलेला नाही. (१० वर्षे सीबीआय पुरावे का गोळा करू शकली नाही ? न्यायालयात केवळ शंका असून उपयोगाचे नसते, तर पुरावे लागतात ! – संपादक) म्हणजे न्यायालयाने कुठेही ‘वीरेंद्रसिंह तावडे यांचा या खटल्याशी संबंध नाही’, असे म्हटलेले नाही. त्यामुळे संशय घेण्यासाठी वाव आहे. (वागळे वारंवार न्यायाधिशाच्या भूमिकेत का जात आहेत ? – संपादक)
‘वीरेंद्र तावडेंना दोषमुक्त केले, त्यांच्या विरोधात पुरावा नाही’, असे न्यायालय म्हणत आहे. मग तुम्ही त्यांना ‘यूएपीए’ लावून ८ वर्षे कारागृहात का ठेवले ? त्यांच्या जामिनासाठी जे अर्ज आले ते का नाकारण्यात आले. त्यांना इतका काळ कारागृहात का ठेवले ?’, हा प्रश्न आपण न्यायालयाला विचारायला हवा. (हाच प्रश्न हिंदुत्वनिष्ठ विचारत आहेत. वागळे यांच्यासारख्या अंनिसच्या पाठीराख्यांनी अन्वेषण यंत्रणांवर दबाव आणल्यामुळे खरे तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि अन्य निरपराधी यांना अटक झाली, अन्यथा आज खरे आरोपी पकडले गेले असते ! – संपादक)
सीबीआयकडे अन्वेषण गेल्यानंतरही ते अतिशय संथगतीने चालू होते; पण दाभोलकरांचे कुटुंबीय उच्च न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि त्यांच्या सहकार्यांनी वारंवार दबाव टाकल्यामुळे अन्वेषणाला थोडी गती आली. (दाभोलकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात जाऊन खटला चालू नये म्हणून प्रयत्न केले. त्यामुळे ५ वर्षे खटला चालू शकला नाही ? हे सत्य वागळे का सांगत नाहीत ? – संपादक) तरी सीबीआय अधिकार्यांनी जे घोळ घालायचे ते घातलेच. प्रारंभी सीबीआय अधिकारी असे सांगत होते की, ‘या कटातील जे मुख्य मारेकरी आहेत ते सारंग अकोलकर आणि विनय पवार आहेत.’
सीबीआयने काही कमी घोळ घातलेला नाही. (सीबीआयने केलेले साक्षी आणि पुरावे यांत मोठा घोळ घालून हे अन्वेषण केलेले आहे, हेच आम्ही सातत्याने सांगत आहोत ! – संपादक) सीबीआय स्वतंत्र आहे; पण ती स्वतंत्रपणे अन्वेषण करते, यावर माझा विश्वास नाही. याचे कारण सीबीआयवर सातत्याने राजकीय दबाव असतो. हिंदुत्वनिष्ठ माणूस पंतप्रधान झालेला आहे. याचा परिणाम सीबीआयच्या अन्वेषणावर झाला नसेल, असे मानायला मी सिद्ध नाही. (राजकीय रंग देत स्वत:चा हिंदुद्वेष प्रकट करणारे वागळे ! मग दोघांना जन्मठेपेची कठोर शिक्षा कशी झाली ? – संपादक) शेवटी कळसकर आणि अंदुरे यांना अटक करण्यात सीबीआयला यश आले. सीबीआयने वीरेंद्रसिंह तावडेंना वर्ष २०१६ मध्ये अटक केली होती आणि त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे गोळा केल्याचा दावाही केला होता. (दावा होता, तर ते न्यायालयापुढे सादर का केले नाहीत ? याचाच अर्थ ते नव्हतेच. – संपादक)
२. हुकूमशहाच्या भूमिकेत जाऊन वागळे समांतर न्यायालय चालवतात का ?
या प्रकरणातील ३ आरोपी सुटल्याविषयी मला दु:ख झाले. कारण त्यांनाही कठोर शिक्षा होण्याची आवश्यकता होती; मात्र सनातनने सुटकेचा नि:श्वास सोडलेला दिसतो आहे. सनातनचे प्रवक्ते म्हणतात की, ‘आमचे निर्दाेषत्व सिद्ध झालेले आहे.’ मला हा प्रश्न विचारायचा आहे की, तुमचे निर्दाेषत्व कसे सिद्ध झाले ? जरी वीरेंद्र तावडे, पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना दोषमुक्त केले असले, तरी ते न्यायालयाने पुराव्यांअभावी दोषमुक्त केले आहे. (अन्वेषण यंत्रणेला पुरावे गोळा करायला तब्बल १० वर्षे दिली. ते पुरावे गोळा करू शकले नाहीत; त्यात अनेक घोळ झाले, हे स्वतः वागळेच सांगत आहेत. तरीही वागळे यांना सनातनलाच दोषी ठरवायचे आहे ! याला निव्वळ सनातनद्वेषच म्हणता येईल ! त्यामुळेच आरोपी सुटल्याविषयी वागळे यांना दुःख झाले आहे ! – संपादक) शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे सनातनशी संबंधित नव्हते का ? कि त्यांचे पितृत्व तुम्ही नाकारत आहात ? त्यांना तुम्ही संघटनेत सामील करून घेतले, त्यांच्याकरवी दाभोलकरांची हत्या घडवली, या सर्व गोष्टी न्यायालयाच्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे ‘आमचे निर्दाेषत्व सिद्ध झाले आहे’, असा सनातनने दावा करणे, हा आगाऊपणा आहे. सनातनचे प्रवक्ते असा आगाऊपणा नेहमीच करत असतात. (सनातनचे प्रवक्ते सत्य सांगत आहेत, ते कायम आक्रस्ताळेपणा करणार्या वागळे यांना बोचत आहे, त्याला कोण काय करणार ? – संपादक)
३. (म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना !’
हा खटला उच्च न्यायालयात जाणार आहे, त्यापुढे सर्वाेच्च न्यायालय आहे, हे सनातनने विसरू नये. माझे तर म्हणणे आहे की, सनातन ही आतंकवादी संघटना आहे. ती असे उपद्व्याप अनेक वर्षांपासून करत आहे. (सनातन यासाठी अब्रूहानीचा दावा घालण्याच्या संदर्भात अधिवक्त्यांशी चर्चा करत आहे ! – संपादक) ‘त्यांना वेसण घालण्यासाठी संस्थेवर बंदी घालावी’, अशी मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना केली होती; पण केंद्र सरकारने मागणी मान्य केली नाही. केंद्र सरकारने त्या वेळीच ही मागणी मान्य केली असती, तर या मंडळींच्या आतंकवादी कारवाया थांबल्या असत्या.
आज दाभोलकरांची हत्या याच मंडळींनी केली, हे सिद्ध झालेले आहे. (‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या वृत्तीचे वागळे ! स्वतःच न्यायाधिशाच्या भूमिकेत जाणारे वागळे ! – संपादक)
४. खोटे बोलण्याच्या सर्व सीमा ओलांडलेले वागळे !
कळसकर आणि सचिन अंदुरे हे दुसरे कुणी नसून सनातनचेच साधक आहेत, हे लक्षात ठेवा. (वागळे यांच्या खोटे बोलण्याला काही सीमाच नाही ! अशा प्रकारे किती दिवस ‘गोबेल्स नीती’ (सतत खोटे बोलल्याने ते खरे वाटणे) वापरणार ? आता हिंदूंना फसवण्याचे दिवस संपले. हिंदू आता जागृत झाले आहेत, एवढे तरी वागळे यांनी समजून घ्यावे ! – संपादक) त्यांची मने कलुषित करून त्यांच्याकडून ही हत्या करून घेण्यात आली. पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या अशाच प्रकारे झाल्या आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे सनातनने हा दावा करण्यात काही अर्थ नाही की, ‘आमचे निर्दाेषत्व सिद्ध झालेले आहे.’ पुढे न्यायालयाची लढाई चालूच रहाणार आहे. (आणि त्या लढाईत उर्वरित आरोपीही मुक्त होतील, यात शंका नाही ! – संपादक)
५. (म्हणे) ‘जोपर्यंत मोदी सरकार आहे, तोपर्यंत निधर्मीवाद्यांना न्याय मिळेल कि नाही ? हे सांगता येत नाही !’
जोपर्यंत नरेंद्र मोदींचे सरकार या देशात आहे, तोपर्यंत ‘सेक्युलरवाद्यां’च्या ज्या हत्या होत आहेत, त्याला न्याय मिळेल कि नाही ? हे सांगता येत नाही, ही खेदाची गोष्ट आहे. (देशभरात हिंदुत्वनिष्ठांच्या ४५० हत्या झाल्या आहेत, याविषयी वागळे यांना काहीच वाटत नाही. इथे त्यांचा मानवतावाद कुठे जातो ? – संपादक)
संपादकीय भूमिकाअसे बिनबुडाचे आरोप करणारे निखील वागळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा कायदेशीर सल्ला घेत आहे ! |