महापािलका अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त : फेरीवाले मोकाट !

अशी होत आहे कांदे – बटाटे यांची टेम्पोमधून विक्री

नवी मुंबई – महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने शहरातील अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया, फेरीवाले यांचे चांगलेच फावले आहे. नेरूळ रेल्वेस्थानक, जुईनगर, सानपाडा रेल्वेस्थानक, ए.पी.एम्.सी. बाराराचा परिसर, वाशी सेक्टर १०, १५, १६ आदी परिसरांत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे.

कांदे व बटाटे यांची रस्त्यवर विक्री होताना

तुर्भे विभाग कार्यालयाअंतर्गत भाजी मार्केटच्या विरुद्ध बाजूकडील रस्ता ते धान्य मार्केटच्या आवक गेटपर्यंत २० ते २५ कांदे-बटाटे विक्रेते चक्क रस्त्याची १ बाजू  मार्गिका व्यापून टेम्पोमध्ये मालाची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे सकाळी ९ वाजल्यापासून पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, १० ते १५ सुरक्षा रक्षक यांच्या ताफ्यासह उपस्थित असतात. तरीही हे रस्ता अडवून कांदे-बटाटे विक्री करणारे टेम्पोवाले हटत नाहीत.

पदपथ व्यापले !

ए.पी.एम्.सी. सिग्नल ते माथाडी सिग्नल पर्यंतचे दोन्ही बाजूंचे पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. या पदपथावर बसलेल्या फेरीवाल्यांकडून खरेदी करण्यासाठी जे लोक येतात, ते तिथेच गाडी उभी करत असल्याने अनेकदा वाहतूककोंडी होते. ए.पी.एम्.सी. बाजारामध्ये येणारे कामगार, खरेदीदार आदी पादचार्‍यांना चालण्यास पदपथ नसल्याने जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे. परिणामी अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत. यामुळे ए.पी.एम्.सी. वाहतूक पोलीस विभागाकडून अनेकदा थेट फेरीवाल्यांवर कलम १०२ अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, तसेच स्वतः वाहतूक पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी अनेकदा त्यांच्या पथकासह या फेरीवाल्यांना हुसकावून लावण्याचे कामही केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे पालिकेच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • वाशी सेक्टर ९ पोलीस चौकी ते जुहू गाव सेक्टर ११ पर्यंतचा पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी व्यापलेला असतो. त्यामुळे या ठिकाणाहूनही पादचार्‍यांना जाण्यास अडथळा निर्माण होत आहे; परिणामी पादचारी रस्त्यावरून जात आहेत.
  • सानपाडा सेक्टर ३ आणि ४ या परिसरातील स्थानकालगतच्या रस्त्यावर आणि पदपथावर फेरीवाल्यांनी सायंकाळच्या वेळेस बस्तान मांडलेले असते. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीस होणारा अडथळा निर्माण होणे, हे नित्याचे झाले आहे.