मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात ५५ टक्के मतदान : किरकोळ घटना वगळता बहुतांश मतदान शांततेत !

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ पासून ते दुपारी अगदी कडक उन्हातही अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा !

कोल्हापूर जिल्ह्यात अगदी ग्रामीण पातळीवरही प्रत्येक मतदान केंद्रावर अशा प्रकारे रांगा लावून मतदान झाले

सर्वाधिक मतदान कोल्हापूर येथे, तर सर्वांत अल्प मतदान बारामती येथे !

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीच्या तिसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रात रायगड, बारामती, लातूर, धाराशिव, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगणले आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा ११ जागांवर मतदान झाले. मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात शेवटची आकडेवारी हातात आली तेव्हा अंदाजे ५५ टक्के मतदान झाले. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी ७ पासून, तसेच दुपारी १२ नंतरही कडक उन्हात अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा दिसून आल्या. कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी ५ पर्यंत ६३.७१ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघात ६२.१८ टक्के मतदान झाले होते. काही किरकोळ घटना वगळता बहुतांश ठिकाणी मतदान शांततेत पार पडले.

कोल्हापूर जिल्ह्यात ‘मर्दानी खेळ’ ही संकल्पना घेऊन मतदान केंद्रावर काढलेली रांगोळी राधानगरी तालुक्यात ‘गवा संवर्धन’ ही संकल्पना घेऊन मतदान केंद्र सजवण्यात आले होते, तसेच माहिती देण्यात आली.
टेंबलाईवाडी शाळा येथील मतदान केंद्रात ‘पंचगंगा नदी’ ही संकल्पना घेऊन रांगोळी काढण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यात पाटगाव येथे ‘मधाचे पाटगाव’ ही संकल्पना वापरून मधाची माहिती देत सजवण्यात आलेले मतदान केंद्र
कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आले  होते. पाचगाव येथे गुलाबाचे फूल देऊन दिव्यांगांचे स्वागत करण्यात आले

राज्यात सायंकाळी ५ पर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान झाले. राज्यात पश्चिम महाराष्ट्रासह एकूण ११ मतदारसंघांत मतदान झाले.

१. बारामती मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत असल्याने त्या लढतीकडे, तसेच कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज आणि शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. बारामती-माढा मतदारसंघात पहिल्या चार घंट्यांमध्ये मतदारांचा विशेष प्रतिसाद लाभला नाही. बारामतीमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४५.६८ टक्के मतदान झाले.

२. कोल्हापूर जिल्ह्यात संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरतील अशा अत्यंत नाविन्यपूर्ण कल्पना वापरून मतदान केंद्र सजवण्यात आले होते. यात अनेक मतदान केंद्रांमध्ये स्वतंत्र मंडप, स्वागत कमानी, पिण्यासाठी थंड पाणी, दिव्यांगांसाठी विशेष सोय, ‘सेल्फी पॉईंट’, त्या त्या तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण घटनांची माहिती, मराठी शाळांची माहिती यांसह आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दुर्गम भागातील नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी सोय करण्यात आली होती. पहिल्यांदा मतदान करणार्‍या तरुणांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक यांचे गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात आले. कोल्हापूर मतदारसंघात १०० वर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या अनेक मतदारांनी राष्ट्रकर्तव्य म्हणून येऊन प्रत्यक्ष मतदान केले.

३. कोल्हापूर शहरात उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर मतदान केंद्रावर महादेव श्रीपती सुतार (वय ६९ वर्षे) यांचा मतदार रांगेतच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.

४. सांगली जिल्ह्यात दुपारी ३ पर्यंत ४१.३० टक्के मतदान झाले होते. मिरजेसह काही जिल्ह्यांत गत वेळी मतदान करूनही यंदा सूचीत नाव नसणे, नावांमध्ये चुका असणे यांसह अन्य काही प्रकार दिसून आले. प्रशासनाने मतदारांना त्यांचे नाव, प्रभाग क्रमांक यांसह माहिती देणारी ‘स्लीप’ वाटल्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात अनेकांना अशा ‘स्लीप’ न मिळाल्याने नेमके मतदान कुठे करायचे ? नाव कुठे आहे ? हे शोधण्यात वेळ गेला.

५. लातूर मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५५.३८ टक्के मतदान झाले होते. यात लातूर ग्रामीण भागात सर्वाधिक ४६.१० टक्के मतदान झाले होते. दुपारी ३ पर्यंत – माढा ५०.१६ टक्के, धाराशिव ५२.३८ टक्के, सोलापूर ४९.८५ टक्के, तर बारामती येथे ४५.६८ टक्के मतदानाची नोंद झाली.

६. सातारा मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५४.११ टक्के मतदान झाले होते. यात कराड दक्षिणला सर्वाधिक ४६.३८ टक्के मतदान झाले होते.

७. रायगड मतदारसंघात ५०.३१ टक्के मतदान झाले आहे.


हातकणंगले मतदारसंघात हाणामारी !

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. मतदान केंद्र ६२ आणि ६३, तसेच सत्यजित पाटील सरुडकर यांच्या खोट्या प्रतिनिधींवर कारवाई करावी, अशी मागणी धैर्यशील माने यांच्या गटाने करत काही काळ मतदान केंद्र बंद ठेवले होते. यावरून पुढे शाब्दिक वाद होऊ हाणामारी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून हाणामारी थांबवली.


धाराशिव जिल्ह्यात राजकीय वादातून मतदान केंद्राजवळ एकाची हत्या !

धाराशिव – जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाटसांगवी या ठिकाणी राजकीय वादातून एका युवकाची हत्या करण्यात आली. मतदानाच्या तिसर्‍या टप्प्यात ठिकठिकाणी मतदान होत असतांना मतदान केंद्राजवळच चाकूने भोसकून या युवकाची हत्या करण्यात आली. गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्र परिसरात दोन गटांमध्ये मतदान केंद्रावर मतदार आणण्यावरून हा वाद झाला. त्यातून एका गटाने दुसर्‍या गटावर चाकूने आक्रमण केले. त्यात एकाचा मृत्यू झाला आहे. समाधान पाटील असे मृत युवकाचे नाव आहे, तर चाकूने आक्रमण करणार्‍या आरोपीचे नाव गौरव अप्पा नाईकनवरे असे आहे. या आक्रमणात अन्य ३ जण गंभीर घायाळ झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. चाकूने आक्रमण करणारा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


सांगोला तालुक्यात पेट्रोल टाकून मतदान यंत्र पेटवण्याचा प्रयत्न !

सांगोला (जिल्हा सोलापूर) – सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथील मतदान केंद्रावर एका संतप्त युवकाने मतदान केंद्रात प्रवेश करत मतदान प्रक्रिया चालू असतांना ‘इ.व्ही.एम्.’ यंत्रावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. यामुळे यंत्र बंद पडले. ही घटना दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मतदान केंद्रावर मोठा गोंधळ उडाला आणि मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली. उपस्थित मतदान केंद्रावरील पोलिसांनी त्या युवकास कह्यात घेतले. त्यानंतर एका घंट्यानंतर दुसरे मतदान यंत्र आणून पुन्हा मतदान प्रक्रिया पहिल्यापासून चालू करण्यात आली.