PEN NO For Goa Students : गोव्यात पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘परमनंट एज्युकेशन नंबर’ ! – शिक्षण खात्याचा निर्णय

पणजी, २ मे (वार्ता.) : पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षापासून ‘कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक’ (परमनंट एज्युकेशन नंबर – पी.ई.एन्.) दिला जाणार आहे. शाळा मध्येच सोडून जाणार्‍या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांना पुन्हा शैक्षणिक क्षेत्रात सामावून घेण्याच्या केंद्राच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या शिक्षण खात्याने हा निर्णय घेतला आहे. ही माहिती शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी एका परिपत्रकाद्वारे दिली आहे.

परिपत्रकात पुढे म्हटले आहे की,

सरकारी, सरकारी अनुदानित, खासगी आणि विशेष विद्यार्थ्यांसाठीची शाळा यांच्या व्यवस्थापनाने पूर्व प्राथमिक ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘यु.डी.आय्.एस्.ई.’ पोर्टलवर जाऊन ११ अंकी ‘पी.ई.एन्.’ सिद्ध करावा, तसेच यापुढे विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्रावर (लिव्हिंग सर्टिफिकेटवर) ‘पी.ई.एन्.’ आणि संबंधित शाळेचा ‘यु.डी.आय्.एस्.ई. कोड’ यांचा उल्लेख करणे बंधनकारक असणार आहे. याविषयी शंका असल्यास त्यांनी ‘गोवा समग्र शिक्षा’च्या ‘ब्लॉक रिसोर्स सेंटर’कडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.