PM MODI : ख्रिस्ती समाजाच्या सहकार्यानेच गोव्यात भाजपचे सरकार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पणजी, २१ एप्रिल (वार्ता.) : गोव्यात अनेक वर्षे भाजपचे सरकार आहे. येथील ख्रिस्ती समाजाने नेहमी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यांचे साहाय्य आणि सहकार्य यांमुळेच गोव्यात दशकभर आमचे सरकार आहे. यामुळे ‘ख्रिस्ती समाज भाजपला पाठिंबा देत नाही’, असे म्हणता येणार नाही; मात्र भाजपला यासाठी अधिक काम करण्याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करत आहोत, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘ईशान्येकडील राज्यात ख्रिस्ती मतदार अधिक आहेत. त्यांच्या मतांमुळेच तेथेही आमचे सरकार येत आहे. तेथे आमचे काही मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री ख्रिस्ती समाजाचे आहेत. केरळमध्ये बूथपासून मोठ्या स्तरावर आमचे नेते आहेत. ख्रिस्ती समाजाचे नेते किंवा बिशप यांना मी वेळोवेळी भेटत असतो. मी स्वत:ही नाताळ मोठ्या उत्साहाने साजरा करतो.’’

पोप फ्रान्सिस यांना भारतात भेट देण्याचे दिले निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘‘मागे एकदा मी व्हॅटिकन येथे पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती आणि या वेळी आम्ही अनेक प्रश्नांवर बराच वेळ चर्चा केली. पोप फ्रान्सिस यांना भारत सरकारने केलेल्या कार्याची माहिती होती. पोप फ्रान्सिस यांना भारताला भेट देण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.’’