४७ सहस्र ३९२ कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाचा आदेश !

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध विभागांतील कर्मचारी, अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्ष निवडणुकीचे काम चालू होण्यापूर्वी जिल्ह्यातील विविध विभागांतील कर्मचारी आणि अधिकारी यांनी निवडणुकीचे काम टाळण्यासाठी खोटी कारणे दाखवून अर्ज केले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने अनुमाने साडेतीन सहस्र कर्मचार्‍यांना दिलेला आदेश रहित करण्याची वेळ आली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी ७१ सहस्र कर्मचार्‍यांची निश्चिती केली होती. त्यापैकी ४७ सहस्र ३९२ कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या कामाचा आदेश दिला आहे; मात्र निवडणुकीचे काम जोखमीचे आणि किचकट असल्याने अनेक कर्मचार्‍यांनी, तसेच अधिकार्‍यांनी या कामातून वगळण्यासाठीचे अर्ज दिले आहेत.

निवडणूक आयोगाच्या विविध २० निकषांन्वये कर्मचार्‍यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचार्‍यांच्या अर्जाची शहानिशा केल्यावरच त्यांचे अर्ज संमत केले आहेत. कर्मचार्‍यांनी निवडणुकीच्या कामातून सुटका करून घेण्यासाठी केलेल्या अर्जात खोटी कारणे आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आतापर्यंत ३ सहस्र ५०० कर्मचार्‍यांचे आदेश रहित केले आहेत.