Sittwe Port : म्यानमारचे सिटेवे बंदर भारताच्या नियंत्रणात !

ईशान्य भारतातील राज्यांना संपर्क करण्यासाठी पर्यायी मार्ग मिळणार !

नवी देहली – म्यानमारच्या सिटवे बंदराच्या संचालनाचे संपूर्ण दायित्व भारताकडे देण्यात आले आहे. सिटवे बंदराचे व्यवस्थापन ‘इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड’कडून पाहिले जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सिटवे येथील कलादान नदीवरील संपूर्ण बंदराचे कामकाज पहाण्याच्या या आस्थापनाच्या प्रस्तावाला संमती दिली आहे. म्यानमारच्या राखीन राज्याची राजधानी सिटवे येथे वर्ष २०१६ मध्ये भारताच्या साहाय्याने सिटवे बंदर बांधण्यात आले होते. इराणमधील चाबहार बंदरानंतर म्यानमारचे सिटवे हे भारताचे दुसरे परदेशी बंदर आहे.

सिटवे बंदर भारतासाठी महत्त्वाचे का आहे?

कोलकाता बंदराला म्यानमारच्या सिटवे बंदराशी समुद्रमार्गे जोडण्यात येणार आहे. यानंतर येथून मिझोरामच्या जोरिनपुईला रस्त्याने जोडले जाईल. मिझोरामला जोडणारा हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर भारताला ईशान्येकडील राज्यांना पुरवठा करणे सोपे होईल. याद्वारे ईशान्येकडील राज्यांमध्ये माल पाठवण्यासाठी पर्यायी मार्ग सिद्ध झाल्यानंतर ‘चिकन नेक’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिलिगुडी महामार्गावरील अवलंबित्वही अल्प होईल. म्हणजेच ईशान्येची संपर्कयंत्रणा वाढवण्याचे काम भारत ज्या वेगाने करत आहे, त्यामुळे चीनला झटका बसणार आहे.