रेल्वेने प्रवास करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यानंतर साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेले सकारात्मक पालट !

१. संतांनी सांगितलेल्या चुका स्वीकारता न येऊन पुष्कळ ताण येणे 

सौ. भारती सुदर्शन

‘मे २०२२ मध्ये मी आणि सहसाधिका सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्याशी संबंधित सेवा शिकण्यासाठी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो.

५.६.२०२२ या दिवशी पू. (सौ.) अश्विनी पवार (सनातनच्या ६९ व्या (समष्टी संत), वय ३४ वर्षे) यांनी मला माझ्याकडून सेवेसंदर्भात झालेल्या चुकांची जाणीव करून दिली. त्या वेळी मला माझ्याविषयी सांगितलेली सर्व सूत्रे स्वीकारता आली नाहीत. त्यामुळे मला पुष्कळ ताण आला होता.

२. मुल्कीला जाण्यासाठी रेल्वेत बसल्यावर सांगितलेल्या चुकांची आठवण होऊन पुष्कळ वाईट वाटणे आणि डोळ्यांतून अश्रू येणे

६.६.२०२२ या दिवशी मी मुल्की येथे जाण्यासाठी रेल्वेत बसले. तेव्हा मला सांगितलेल्या चुकांची आठवण होऊन पुष्कळ वाईट वाटू लागले आणि माझ्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. मी कितीही प्रयत्न केले, तरीही अश्रूंवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जन्मस्थान ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यावर शरिरावर रोमांच येऊन मन शांत होणे आणि स्वतःच्या चुकांविषयी चिंतन होऊ लागणे 

मी प्रवासात खिडकीच्या बाहेर बघत होते. काही वेळाने रेल्वे एका स्थानकावर थांबली. मी ‘कोणते स्थानक आहे ?’, ते पहाण्यासाठी उत्सुकतेने बाहेर पाहिले, तर ते ‘नागोठणे’ स्थानक होते. ‘नागोठणे’ (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जन्मस्थान) हे नाव वाचल्यावर माझ्या शरिरावर रोमांच आले. माझे मन शांत झाले आणि डोळ्यांत अश्रू यायचे थांबले. त्यानंतर ‘माझ्याकडून काय चूक झाली ?’, याविषयी माझे चिंतन चालू झाले.

४. ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यावर झालेले पालट

अ. मला वाटले, ‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आपल्याला संतांचा सत्संग मिळतो. पू. (सौ.) अश्विनीताईंनी घेतलेल्या सत्संगामुळे माझे कितीतरी जन्मांचे प्रारब्ध न्यून झाले असेल.’ त्याबद्दल मला कृतज्ञता वाटली.

आ. मला सहसाधकांविषयी येणार्‍या प्रतिक्रिया थांबून मला त्यांच्याविषयी प्रेम वाटू लागले.

५. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाणे

नंतर मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी (टीप) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आले. तेव्हा मला वाटले, ‘साक्षात् विष्णुस्वरूप गुरुदेवांच्या जन्मस्थानाचे केवळ नाव ऐकून माझ्यामध्ये पालट झाले. आता मी रामनाथी आश्रमात आले आहे. साक्षात् विष्णुस्वरूप गुरुदेवांचे निवासस्थान असलेल्या रामनाथी आश्रमात आल्यावर माझ्यामध्ये कितीतरी सकारात्मक पालट होऊ शकतात !’

(स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या अयोग्य कृती अन् विचार वहीत लिहून त्या कोणत्या स्वभावदोषांमुळे झाल्या ते लिहिणे आणि त्यापुढे योग्य कृती आणि विचार लिहिणे अन् दिवसातून १० ते १२ वेळा मनाला तशी सूचना देणे उपयुक्त ठरते.)

‘गुरुदेव, मी साधनेचे प्रयत्न करण्यात पुष्कळ न्यून पडत आहे. ‘तुम्हीच माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी सेवा करून घ्या’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’

– सौ. भारती सुदर्शन, मुल्की सेवाकेंद्र, कर्नाटक.
(१०.१०.२०२३)