अंतर्मुखता, निर्मळता आणि इतरांचा विचार करणे हा स्थायीभाव असणार्‍या सनातनच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) !

सनातन संस्थेच्या ४८ व्या (व्यष्टी) संत पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील कु. कौमुदी जेवळीकर यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी

१. स्वावलंबी

‘पू. आजी प्रतिदिन संध्याकाळी स्वतः दुसर्‍या दिवशी अंघोळीसाठी लागणारे कपडे दोरीवरून काढून सर्व सिद्धता करतात. दिवसभरात त्या स्वतः अनेक कामे करतात.

कु. कौमुदी जेवळीकर

२. उत्तम स्मरणशक्ती

या वयातही त्यांची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे. मी एक दिवस कपडे धुतले आणि दुसर्‍या दिवशी ते दोरीवरून काढायला पूर्णतः विसरले; परंतु आजींनीच मला आठवण करून दिली. असे अनेक प्रसंगांत त्यांना सगळे आठवते.

३. दृष्टी चांगली असणे

या वयातही पू. आजींना दूरचे स्पष्ट दिसते. त्या दूर बसलेल्या साधकाला ओळखतात. खोलीतली काठीची जागा पालटली, तरी त्यांना चष्मा न लावता ती दिसते. प्रत्यक्षात ती भिंत आणि काठी दोन्ही पांढर्‍या रंगाचे असल्याने काठी एवढी उठून दिसत नाही.

४. सहजता

या वयातही त्या पहाटे ४ वाजता जराही आवाज न करता अंघोळ करतात. ‘त्या अंघोळीला केव्हा जातात आणि येतात ?’, हे आम्हा खोलीतील साधिकांना कळतही नाही.

५. निर्मळता

त्यांच्याकडे बघूनच त्यांची निर्मळता जाणवते. त्यांचे हास्य पुष्कळ मधुर आहे.

६. अंतर्मुखता

त्या माझ्याकडे बघत असूनही ‘त्या माझ्याकडे पहात नाहीत’, असे मला वाटते. ‘आपल्या आत त्या बघतात’, असे मला जाणवते. (त्या बघत असतांना आध्यात्मिक त्रासामुळे मला कधीकधी भीतीही वाटते.)

७. इतरांचा विचार करणे

अ. ‘इतरांचा विचार करणे’ हा पू. आजींचा स्थायीभावच आहे. खोलीत कुणी झोपत असेल आणि पंखा लावायचा असेल, तर इतरांना न सांगता त्या स्वतःच लावतात.

आ. दात घासतांना ‘बेसिन’चा दिवा लावला, तर इतरांची झोपमोड होऊ नये; म्हणून त्या दरवाजा लावून घेतात.

इ. एकदा मी माझे अंथरूण पलंगासमोर घातले होते. तेव्हा मी झोपल्यावर सहसाधिकेला पलंगाच्या खणातील तिचे अंथरूण काढायला अडचण येऊ नये; म्हणून ‘‘तिचे अंथरूण काढून ठेव’’, असे पू. आजींनी मला सांगितले. हे सूत्र माझ्या ध्यानी-मनीही नव्हते.

८. चैतन्य मिळून त्रास न्यून होणे

पू. आजी आणि त्यांच्या सून सौ. ज्योती दाते काकू (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५९ वर्षे) यांच्या समवेत राहिल्यामुळे माझ्या मनाचा निरुत्साह पुष्कळ अल्प झाला. मला त्रासामुळे ‘सतत झोपावे’, असे वाटायचे. मी सकाळी उशिरा उठायचे, तेही न्यून झाले आणि त्यांच्याकडून मला शिकण्यातला आनंद घेता येऊ लागला.

‘हे गुरुमाऊली, पू. दातेआजींच्या गुणांचे दर्शन घेऊन ते मला अंतरात कोरता येऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०२३)