शिक्षकांच्या वस्त्रसंहितेला पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध !

शिक्षकांच्या वस्त्रसंहितेला पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध !

(वस्त्रसंहिता म्हणजे शाळेत परिधान करावयाच्या कपड्यांविषयीची नियमावली)

जुन्नर (जिल्हा पुणे) – विद्यार्थी अनुकरणप्रिय असतात. त्यामुळे जर शिक्षकाची वेशभूषा ही अशोभनीय असेल, तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. ही गोष्ट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने राज्यातील सर्व  शिक्षकांसाठी नवीन वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र राज्यातील शिक्षकांसाठी नवीन वस्त्रसंहिता लागू करण्यास ‘अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघा’चा विरोध असल्याचे पुणे जिल्हाध्यक्ष सुभाष मोहरे यांनी सांगितले, तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनीसुद्धा विरोध दर्शवला आहे.

शिक्षकांना वस्त्रसंहिता देण्याचा निर्णय योग्य असला, तरी कोणत्या पद्धतीचा किंवा रंगाचा पोशाख असावा इतके खोलवर जाण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे या निर्णयाला विरोध होऊ शकतो, असे मत संघटनेचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अल्पसंख्यांक सर्व व्यवस्थापन अंतर्गत येणार्‍या सर्व प्रकारच्या अनुदानित शाळांतील कार्यरत शिक्षक हे भावी पिढी घडवत असतात. या शिक्षकांचा संबंध हा विद्यार्थी, पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्याशी येत असतो. अशा वेळी त्यांची वेशभूषा हा त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून पाहिले जाते. वरील सर्व विषयांना अनुसरून हा निर्णय घेण्यात आला आहे.