वजन न्यून करण्यासाठी मधपाणी किंवा लिंबूपाणी किती उपयोगी आहे ?

मधपाणी किंवा लिंबूपाणी यामध्ये शीतपेय (कोल्ड ड्रिंक्स) किंवा फळांचा रस यापेक्षा अल्प उष्मांक असतात. अर्धे लिंबू पाण्यात पिळून प्यायले, तर त्यातून ९ उष्मांक मिळतात आणि जर १ सपाट चमचा मध पाण्यात घातले, तर ३४ उष्मांक मिळतात. बरेच लोक वजन न्यून करण्यासाठी सकाळी उठल्यावर मध, लिंबू आणि पाणी किंवा लिंबूपाणी पितात. सकाळी उठल्यावर जर हे प्यायले, तर शरीर ‘हायड्रेट’ होते, म्हणजे पाणी मिळते आणि चयापयाची प्रक्रिया सुधारायला साहाय्य होऊ शकते. या पेयातून पुष्कळ कमी प्रमाणात ‘फायबर्स’ (तंतू), जीवनसत्त्व आणि ‘मिनरलस’ (खनिज पदार्थ) मिळतात. 

डॉ. प्रणिता अशोक

लिंबूपाण्यापेक्षा लिंबाचा रस वेगवेगळ्या पदार्थांवर घेणे महत्त्वाचे

ज्यांना फक्त मध, लिंबू, पाणी प्यायल्यानंतर पोट साफ होते, भूक न्यून होते, उत्साहवर्धक वाटते, तसेच ‘वजन नियंत्रणात आहे’, असे वाटते, त्यांनी ते चालू ठेवण्यास हरकत नाही. लिंबातून ‘जीवनसत्त्व क’ (व्हिटॅमिन सी) मिळते; पण ते इतर गोष्टीतूनही मिळते. लिंबाच्या रसात सापडणार्‍या आम्लामुळे दातांवरच्या चकचकीत कठीण आवरणावर परिणाम होऊन दात किडू शकतात. पित्ताचा (‘ॲसिडिटी’चा) त्रास असेल, तर तो आणखीन वाढू शकतो. उपाशीपोटी कुठलीही गोष्ट घेतली की, शरिरात त्याची प्रतिक्रिया लगेच होते. लिंबूपाणी उपाशीपोटी पिण्यापेक्षा संध्याकाळी घ्यावे. लिंबूपाण्याच्या ऐवजी लिंबाचा रस वेगवेगळ्या पदार्थांवर घेऊ शकतो. त्यामुळे लोहाचे शरिरात चांगल्या पद्धतीने शोषण होऊ शकते आणि लिंबातून ‘व्हिटॅमिन सी’ मिळते. लिंबाच्या सालामध्येही जीवनसत्त्व आणि खनिज पदार्थ असतात. त्यामुळे तुम्ही लिंबाचे लोणचे खाऊ शकता.

चरबी न्यून करण्यासाठी नियमित व्यायाम करणे आणि योग्य आहार घेणे आवश्यक !

लिंबूपाणी किंवा मधपाणी घेतल्यामुळे चरबी न्यून होत नाही. चरबी न्यून करण्यासाठी नियमित व्यायाम करणे आणि योग्य आहार घेणे आवश्यक आहे. लिंबूपाणी घेतल्यामुळे जर वजन न्यून झाले असेल, तर हे बघितले पाहिजे की, त्या व्यक्तीने जीवनशैलीत काही पालट केला आहे का ?

– डॉ. प्रणिता अशोक, एम्.बी.बी.एस्., एम्.डी., पीएच्.डी. (आहारविषयक)