संभल (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान मोदी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत नसते, तर बंगाल बांगलादेशमध्ये गेला असता, असे विधान काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी पत्रकार परिषदेत येथे केले.
सौजन्य Live Hindustan
५९ वर्षीय प्रमोद कृष्णम् हे मूळचे संभळ जिल्ह्यातील ऐचोडा कंबोह या गावचे रहिवासी आहेत. प्रमोद कृष्णम् यांनी संभळ जिल्ह्यात ‘श्री कल्की फाऊंडेशन’ची स्थापना केली, ज्याचे ते पीठाधीश्वरदेखील आहेत.
काँग्रेस ही बुडणारी नौका !
आचार्य कृष्णम् पुढे म्हणाले, राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. काँग्रेस ही बुडणारी नौका असून राहुल गांधी हे या नौकेचे कॅप्टन आहेत. या बुडत्या नौकेतून काँग्रेसचे वरिष्ठ नेते एकामागून एक उड्या मारतील. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेत्यांची घुसमट होत आहे. सर्व मोठ्या नेत्यांचा अपमान होत आहे.
पराभवाच्या भीतीनेच राहुल गांधी यानं अमेठीमधून उमेदवारी नाही !
आचार्य कृष्णम् पुढे म्हणाले, पराभवाच्या भीतीनेच राहुल गांधी यांना अमेठीमधून उमेदवारी देण्यात आली नाही. त्याऐवजी सुरक्षित अशा केरळमधील वायनाड येथून ती देण्यात आली. अमेठीच्या जनतेने स्मृती इराणींना स्वीकारले आहे. त्यांच्या सुख-दु:खात स्मृती इराणी त्यांच्या पाठीशी उभ्या आहेत. राहुल गांधी ५ वर्षात ५ वेळाही अमेठीला गेले नाहीत.
विरोधी पक्षांची आघाडी ही चोरांची टोळी !
विरोधी पक्षांची आघाडी ही चोरांची टोळी आहे. यामध्ये सर्व जण एकमेकांच्या पाठीत वार करत आहेत. फारुख अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीर आणि देश यांच्या हितासाठी लवकरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी व्हायला हवे. कमलनाथ यांनी आता काँग्रेस सोडली पाहिजे, असे माझे मत आहे. सुरेश पचौरी, गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांना काँग्रेस सोडायला भाग पाडले गेले. काँग्रेसमध्ये राहिलेले वरिष्ठ नेतेही लवकरच काँग्रेस सोडणार आहेत.
काँग्रेसमधून मुक्त केल्याविषयी कृतज्ञ !
पक्षविरोधी कारवायांमुळे माझी ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्याचा आदेश नुकताच देण्यात आला. मला काँग्रेसमधून मुक्त केल्याविषयी मी काँग्रेस नेतृत्वाचे आभार मानतो. श्रीराममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचेे निमंत्रण स्वीकारणे, श्री कल्की धामची पायाभरणी करणे, नरेंद्र मोदी यांना भेटणे, सनातन धर्माविषयी बोलणे, हे पक्षविरोधी आहे का ? राहुल यांना ‘एक्स’वर टॅग केले आणि लिहिले – ‘राम आणि राष्ट्र यांच्याशी तडजोड होऊ शकत नाही.’