कायद्यांचा वाढता अपवापर : समाजासाठी घातक !

मध्यप्रदेशमधील जबलपूर येथे सोनिया केसवानी या विवाहित महिलेला ६ पुरुषांवर खोट्या बलात्काराच्या केसेस आणि पैशासाठी ‘ब्लॅक मेल’ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही महिला विविध समाजमाध्यमांतून पुरुषांना संपर्क करून वा मैत्री करून आणि पुढे प्रेमाचे नाटक करून त्यांच्याकडून पैसे उकळायची. पुरुषांनी पैसे द्यायला नकार दिल्यावर बलात्काराच्या तक्रारीची धमकी द्यायची. बलात्कार हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यात कठोर शिक्षेचे प्रावधान (तरतूद) आहे; पण जेव्हा एखाद्या पुरुषावर बलात्काराची खोटी तक्रार केली जाते, तेव्हा त्या पुरुषासह त्याच्या कुटुंबावर काय वेळ येत असेल ? अशा व्यक्तीकडे आप्तस्वकीय, नोकरीच्या ठिकाणी, मुलांच्या शाळेत कोणत्या दृष्टीने पाहिले जाते. पुढे जाऊन जरी संबंधित पुरुष हा निर्दोष सुटला, तरी त्याला पुन्हा सामान्य आयुष्य जगणे किती कठीण जाऊ शकते, याचासुद्धा विचार करणे आवश्यक आहे. त्याला त्याच्या नोकरीत परत सन्मानाने सामावून घेतले जाईल का ? त्याला झालेली आर्थिक हानी भरून दिली जाणार का ? सोनिया केसवानीसारख्या उदाहरणातून केवळ काही तरी मिळवण्यासाठी काही स्त्रिया बलात्कारासारख्या प्रकरणी खोट्या तक्रारी करू शकतात. यामुळे पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते, हे यातून समोर येते.

काही महिलांकडून बलात्कार वा पोटगी यांसंबंधी कायद्यांचा अपवापर केवळ पैसे मिळवण्यासाठी केला जात आहे. यामुळे असे कायदे करण्यामागच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. बलात्काराच्या दोषीला कायद्यात कठोर शिक्षा आहे, तशीच कठोर शिक्षा बलात्काराची खोटी तक्रार देणार्‍या महिलांना लागू केली, तर अशा कायद्यांचा दुरुपयोग करण्याच्या अपप्रवृत्तीला आळा बसेल.

– श्री. अनिकेत शेटे, चिंचवड, जिल्हा पुणे. (२१.२.२०२४)