संपादकीय : उद्दामतेचा मेणबत्ती मोर्चा !

शिवजयंतीच्या दिवशी (१९ फेब्रुवारीला ) दक्षिण गोव्यातील सां जुझे दि आरियल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर धर्मांध ख्रिस्त्यांनी मातीचे गोळे फेकून आक्रमण केले. या प्रकरणाविषयी शांततेत चर्चा करणार्‍या मंत्री फळदेसाई यांना त्यांनी ‘हुश हुश’ म्हणत पिटाळून लावले. यासाठी कारण पुढे केले ते बेकायदेशीर बांधकामाचे ! कायदा हातात घेतल्याप्रकरणी पोलिसांनी २० आक्रमणकर्त्यांवर गुन्हे नोंद केले आहेत; हे गुन्हे मागे घेण्याची मागणी तेथील ख्रिस्ती आमदार, खासदार, सरपंच, ग्रामस्थ यांनी प्रशासनाकडे केली आहे.

राज्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये; म्हणून मंत्री फळदेसाई यांनी स्वतःहून या प्रकरणी तक्रार केली नाही; परंतु याचा अपलाभ छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष करणार्‍या धर्मांध ख्रिस्त्यांनी घेतला. कागदपत्रे नाहीत, भूमीचा वाद आहे, बांधकाम बेकायदेशीर आहे, भूमीवर भराव टाकला आहे, अशी कारणे पुढे करून शिवरायांच्या पुतळ्याला जोरदार विरोध केला जात आहे. अयोग्य कृती करण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी प्रसंगी सौम्य लाठीमार केला, गुन्हे नोंद केले; म्हणून कथित शांतीचा संदेश देणार्‍या ख्रिस्त्यांनी उद्दामपणे मेणबत्ती मोर्चा काढला. त्याही पुढे ‘गुन्हे मागे घ्या’, शिवरायांच्या पुतळ्याला काही झाले, तर आम्ही उत्तरदायी नाही, असे निवेदन दिले. सरपंचांपासून सगळे ख्रिस्ती यासाठी एकत्र येत आहेत. ख्रिस्त्यांची ही कृती ‘चोर तो चोर वर शिरजोर’, अशा प्रकारचीच आहे. ‘आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात नाही’, असे जरी ते म्हणत असले, तरी त्यांचा विरोध शिवरायांना आहे, हे ते स्वतःच स्वतःच्या कृतींतून दाखवून देत आहेत.

शिवरायांच्या पुतळ्याचे बांधकाम, त्याची जागा बेकायदेशीर असल्याचा आरोप करणार्‍या या कथित शांतताप्रिय समाजाने हा प्रश्न शांतपणे चर्चा करून सोडवायला हवा होता; पण उद्दामपणे ‘मेणबत्ती मोर्चा’ काढून स्वतःवर अत्याचार होत असल्याचे नाटक कशासाठी केले जात आहे ? शिवरायांच्या पुतळ्यासाठी कायदेशीर कागदपत्रे असल्याचे पुरावे शिवप्रेमी यांनी दिले आहेत. पुतळ्यासाठीच्या लोखंडी बांधकामासाठी अनुमती घेतली आहे, तरीही त्याला विरोध का केला जात आहे ? शिवप्रेमी या प्रकरणी अत्यंत संयमाने वागत आहेत. त्यामुळे आता स्वतःचा खोटारडेपणा चव्हाट्यावर येणार असल्याचे लक्षात येताच शांतीप्रिय (?) लोकांनी मेणबत्ती मोर्चा काढण्याची कृती केली आहे, हे समजायला जनता दूधखुळी नक्कीच नाही. वरकरणी जरी कुठलीही कारणे पुढे केली जात असली, तरी यामागील मूळ हेतू निराळाच आहे आणि यामागे कुणा बाहेरील व्यक्तीचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राहिला प्रश्न अवैध बांधकामाला विरोध करण्याचा, तर गोव्यात जागोजागी क्रॉस आहेत. रस्त्यांवरील अशा क्रॉसमुळे अपघातही झाल्याच्या घटना आहेत. त्याला किती ख्रिस्त्यांनी विरोध केला ? सांकवाळ येथील पुरातत्व विभागाच्या जागेत कुणाचीही अनुमती न घेता ८ लोखंडी क्रॉस उभारण्यात आले आहेत. यालाही चर्च संस्थेचा पाठिंबा आहे.

सर्व पूर्वनियोजितच !

या घटनेनंतर मंत्री फळदेसाई यांनी एका मुलाखतीत सत्य सांगितले की, पुतळ्याचे अनावरण करून परत येतांना तोंडाला रूमाल बांधलेल्या महिला आणि काही पुरुष यांनी मातीचे गोळे माझ्यावर फेकले. त्यांतील काही लोक ‘त्यांना कुणीतरी मारले आहे’, असे भासवण्याचा प्रयत्न करत माझ्यासमोर भूमीवर लोळण घेत होते. ‘मी किंवा पोलीस यांच्यापैकी कुणीतरी त्यांना मारत आहोत’, असे दाखवण्याचा ते प्रयत्न करत होते. मंत्र्यांच्या या विधानावरून हे आक्रमण पूर्वनियोजित, जाणीवपूर्वक, शिवाजी महाराजांच्या द्वेषापोटी आणि शांतताप्रिय गोव्यात कलह निर्माण करण्यासाठी करण्यात आले, हे कुणालाही लक्षात येईल.

राज्यात शिवरायांच्या अवमानाच्या घटना होतच आहेत. कधी सामाजिक माध्यमांतून, तर कधी बोलमॅक्स परेरासारख्या ख्रिस्ती पाद्र्यांकडून ! ख्रिस्ती जनतेच्या मनावर शिवरायांच्या विरोधात जाणीवपूर्वक आकस निर्माण करण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे, हे सां जुझे दि आरियल येथील प्रकरणातून समोर आले आहे. यापूर्वी बोलमॅक्स परेरा यांनी ‘शिवरायांना देवता मानू नका’, असे हिंदूंचे प्रबोधन करायला हवे’, असे वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट झाल्यावरही स्थानिक ख्रिस्ती आमदार, इतर ख्रिस्ती नेते आणि धर्मांध ख्रिस्ती यांनी बोलमॅक्स परेरा यांना पाठीशी घातले होते. काही वर्षांपूर्वी पेडणे तालुक्यातील एका कार्यक्रमात तेथील एका फादरने ‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी पोर्तुगिजांवर आक्रमण केल्यावर पोर्तुगिजांनी त्यांच्या गव्हर्नरचा दंड सेंट झेवियर याच्या शवाजवळ ठेवून प्रार्थना केल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे आक्रमण थांबले आणि ते परत निघून गेले’, असा चमत्कार झाल्याचे सांगून झेवियरचे उद्दातीकरण आणि शिवरायांचा अवमान केला होता. या सर्व गोष्टी ख्रिस्ती जनतेच्या मनात शिवरायांच्या विरोधात किती आकस आहे, ते दर्शवतात.

हे प्रश्न अनुत्तरित !

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन आणि वेळीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी  ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची मागणी केली आहे. खासदार सार्दिन यांनी ‘मला शिवरायांविषयी आदर आहे’, असे म्हटले; पण आता अप्रत्यक्षपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करतांना मंत्र्यांवर मातीचे गोळे फेकणार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याची त्यांची मागणी ही पुढील लोकसभा निवडणूक लक्षात घेऊन मतांसाठी केलेली कृती तर नाही ना ? असा प्रश्न निर्माण करते. खासदारांना मंत्र्यांवर झालेल्या आक्रमणाविषयी काही वाटत नाही, तर आक्रमणकर्त्या ख्रिस्त्यांचा पुळका येतो. कायदा आणि सुव्यवस्था ख्रिस्त्यांनी बिघडवली आणि आता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखायची का ? हे असे लोकप्रतिनिधी निवडून आल्यास कशा प्रकारे राज्यकारभार करतील ? ते जनतेने लक्षात घ्यावे. राज्यातील वातावरण बिघडू नये, यासाठी शिवप्रेमी आणि सरकार प्रयत्नरत असतांना चर्च संस्थांकडून ख्रिस्त्यांचे प्रबोधन करणारे कोणतेही विधान अद्यापपर्यंत करण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणी चर्च संस्थेचीही भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. आज एका मंत्र्यांवर आक्रमण झाले, उद्या शिवप्रेमी हिंदूंवर ही वेळ येणार नाही, याची शाश्वती कोण देणार ? त्यामुळे शिवप्रेमी हिंदूंनी स्वतःच्या आणि त्यांच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी स्वतःला सिद्ध करणे आवश्यक आहे.

राज्यात शांतता राखण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार्‍यांवरील गुन्हे मागे घेण्याची संतापजनक मागणी करणारे काँग्रेसवाले !