शिवनेरी गडावर ‘शिवजन्मोत्सव’ साजरा !
जुन्नर (जिल्हा पुणे) – छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तूकला, अभियांत्रिकी, गडावरील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. महाराज म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले यशस्वी नेतृत्व होते. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. छत्रपतींनी स्वराज्यासाठी हाती तलवार घेतली; परंतु त्यांनी निष्पापांच्या रक्ताने ती रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला (रणनीतीला) रक्ताचा वास येत नाही, मानवतेचा सुगंध येतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते शिवनेरी गडावर आयोजित केलेल्या ‘शिवजन्मोत्सव’ सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मराठा समाजाला इतर कुणाचीही हानी न करता, कुठल्याही समाजाला धक्का न लावता टिकणारे, कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन त्यामध्ये निर्णय घेऊ.
शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९४ वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्यासह मंत्री, नेते तसेच शासकीय अधिकारी उपस्थित होते. वर्ष २००० पासून या शासकीय जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला. सकाळी सर्व प्रमुख पाहुणे गडावर उपस्थित झाले. ‘शिवजन्मोत्सवा’चा पाळणा झाल्यानंतर ते पालखीच्या स्थानी पोचले. पालखीला पोलीस पथकांकडून मानवंदना देण्यात आली. बाल मावळ्यांनी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.