नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) – श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तप:साधनेने पावनमय झालेल्या कृष्णा-पंचगंगा संगमावर कृष्णावेणी उत्सवास १६ फेब्रुवारीला भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. उत्सवाचे मानकरी कागलकर बंधूंच्या घरातून कृष्णावेणी मातेची सालंकृत मूर्ती सवाद्य मिरवणुकीने श्री दत्त मंदिर परिसरात नेण्यात आली. उत्सवाच्या मुख्य मंडपामध्ये मंत्रोच्चारांसह कृष्णावेणी मूर्तीची विधीवत् प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. मिरवणूक मार्गात महिलांनी कृष्णावेणी मातेचे औक्षण करत आरती केली. पुढील १० दिवस हा उत्सव चालणार असून यात गायन, अभंगवाणी, प्रवचन, आशीर्वचन, असे विविध कार्यक्रम होणार आहेत.