साधक आणि त्याचे कुटुंबीय पूर्णवेळ साधना करू लागल्यानंतर गुरुकृपेने त्याला त्याच्या गावाकडील घराच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे अन् घराचे रक्षण होत असल्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘एप्रिल २०२३ मध्ये मी टाकळी, ता. आष्टी, जि. बीड येथील आमच्या घरी गेलो होतो. मी अनुमाने ३ वर्षांनंतर घरी गेलो होतो. तेव्हा मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

 १. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ‘साधकाचे गावातील घर पुण्यभूमी आहे’, असे सांगणे आणि घरी गेल्यावर साधकाची भावजागृती होणे

पूर्वी मला ‘माझे घर हे सर्वसाधारण घर आहे’, असे वाटत असे. एकदा मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत सेवेनिमित्त घरी गेलो होतो. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तुमच्या घराची भूमी पुष्कळ पुण्यवान आहे. त्या भूमीमुळे तुमचे संपूर्ण कुटुंब सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे.’’

या वेळी माझी घराकडे पहाण्याची दृष्टी वेगळी होती. या वेळी घरी गेल्यावर माझी भावजागृती झाली. मी ७ वर्षांचा असतांना आईने मला ज्ञानेश्वरीचे पारायण करायला शिकवले. या ठिकाणी साधकांच्या माध्यमातून मला गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) सत्संग लाभला आणि माझी साधना चालू झाली. या घराने मला असे दैवी संस्कार दिले की, ज्यामुळे माझ्यात देव, देश आणि धर्म यांच्या प्रती आवड निर्माण झाली. देवाने या ठिकाणी मला कितीतरी दैवी अनुभूती दिल्या; मात्र या अनुभूती आणि स्थान यांचे महात्म्य मला जीवनात गुरु आल्यानंतरच समजले.

२. ‘गुरुदेवच देवघराचे रक्षण करत आहेत’, असे वाटणे

मी घरी गेल्यावर घरासमोरील गवत आणि केर काढून स्वच्छता केली. मागील ७ – ८ मासांपासून कुणीही स्वच्छता किंवा देवांची पूजा केली नव्हती, तरीही देवतांच्या प्रतिमेवर धूळ साचली नव्हती. ‘गुरुदेवच देवघराचे रक्षण करत आहेत’, असे मला वाटले.

३. गावातील लोकांनी साधकाला ‘तुझ्या आईचे कष्ट फलद्रूप झाले आणि तुमचा पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय योग्य आहे’, असे सांगणे

आम्ही घरी आलेले पाहिल्यावर आसपासचे लोक आमच्या घरी येऊन मला सांगू लागले, ‘‘तुम्हाला पाहिल्यावर चांगले वाटते. तुम्हाला पाहिल्यावर मन भरून येते. तुमच्या आईने पूर्वी पुष्कळ त्रास सहन केले. त्यांनी तुम्हाला पुष्कळ कष्ट घेऊन वाढवले आणि शिकवले. त्यांच्या कष्टाचे तुम्हाला फळ मिळाले. तुम्ही पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला, ते चांगले झाले.’’

माझ्या बाबांचे भजनी मंडळातील एक मित्र दुचाकीवरून जात होते. त्यांनी आमच्या घराचे दार उघडे असलेले पाहिले. ते घरापासून दूर गेले होते, तरीही ते माघारी वळून आम्हाला भेटायला आले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘तुमचे काम करून परत येतांना आम्हाला भेटला असतात, तरी चालले असते.’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही कधीही अकस्मात् परत जाता. मागच्या वेळी तुम्हाला भेटायचे राहिले होते; म्हणून आता भेटायला आलो.’’ ‘आम्हाला ज्या लोकांनी पूर्णवेळ साधना करायला विरोध केला, ते आता आमच्या या निर्णयाने आनंदी झाले आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

४. गुरुकृपेने अध्यात्मप्रसार आपोआप होणे

आमच्या शेजारच्या एक काकू मला त्यांच्या घरातील अडचणी सांगत होत्या. त्यांनी सांगितले, ‘‘मागे सांगितल्याप्रमाणे मी प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करते. आणखी कोणता नामजप करायला हवा ?’’ मी त्यांना गुरुदेव दत्ताच्या नामजपासह कुलदेवतेचा नामजप करायला सांगितला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आमच्या घरी धर्मशिक्षणवर्ग चालू असतांना त्या काकू सहभागी होत असत. धर्मशिक्षणवर्गात सांगितलेले लक्षात ठेवून त्या नामजप करत होत्या. गुरुदेवांनी पेरलेल्या बिजामुळे आपोआप प्रसार होतो.’

५. गुरुदेवांच्या कृपेने नाग आणि कुत्रा यांनी साधकाच्या घराचे रक्षण करणे

आमच्या शेजारचे काका मला म्हणाले, ‘‘तुमच्या घराच्या बाजूला २ मोठे नाग आणि नागीण रहातात. ते ६ – ७ फूट लांबीचे आहेत. ते तुमच्या घराभोवती सतत फिरत असतात. ते अनेक जणांना दिसतात. त्यामुळे तुमच्या घरात येण्याचे कुणाचेही धाडस होत नाही. २ वर्षांपूर्वी तुमच्या घराबाहेरील पायर्‍यांवर कुत्रा आणि कुत्री रात्रभर बसलेले असत. सकाळ झाल्यावर ते कुठेतरी जात असत.’’ मी याविषयी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगितल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही सर्व सोडून पूर्णवेळ साधना करायला आश्रमात आला आहात. गुरुदेवांच्या कृपेने नाग आणि कुत्रा हे दैवी जीव तुमच्या घराचे रक्षण करण्याची सेवा करत आहेत. ते स्वतःहून कुणाला त्रास देणार नाहीत.’’

६. समाजातील लोकांची दयनीय स्थिती

‘गावातील लोकांची स्थिती दयनीय झाली आहे’, असे माझ्या लक्षात आले, जसे १३ – १४ वर्षांच्या मुलांना व्यसन लागणे, लोकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास असणे, लहान सहान कारणांमुळे कुटुंबांत भांडणे होणे, एकमेकांवर टीका करणे, साधना न करणे. अशा स्थितीत समाजात राहून ‘साधना करणे कठीण आहे’, हे माझ्या लक्षात आले.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

प.पू. गुरुदेव, तुम्ही मला या मायेच्या सागरातून बाहेर काढले. तुमच्या कृपेने मला आश्रमात राहून साधना करता येत आहे; मात्र ‘मी साधना करायला न्यून पडत आहे’, त्याबद्दल मी तुमच्या चरणी क्षमायाचना करतो. ‘तुम्ही सांगितलेले साधनेचे प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून अखंड करून घ्या’, अशी तुमच्या कोमल चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. वाल्मिक भुकन, चेन्नई (२६.७.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक