इतिहास आणि धर्मशास्त्र !

प्रबोधन मालिका

‘अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सर्व स्थिती आणि लय यांचा अभ्यास करून ‘योगादिशास्यद्वास’ ही शास्त्रीयता लक्षात आणून देण्यासाठी ‘इतिहास’ हे एक शास्त्र बनवले. त्या वैदिक लोकांना इतिहास म्हणजे काय ? आणि त्याच्या अभ्यासाचे महत्त्व काय ? हे अलीकडे थोडे थोडे समजू लागले आहे’, असे पाश्चात्त्य पंडित अन् त्यांचे मानसपुत्र आमच्याकडील आंग्ल विद्याविभूषित पंडितही मोठेपणाचा आव आणून म्हणत असतात. संस्कृत विद्वान ए.एस्. मॅकडोनेल म्हणतात, ‘History is the one weak spot in Indian litereting. It is in fact, non existent.’ (भारतीय साहित्यात इतिहास हे एक कमकुवत स्थान आहे. हे खरे तर अस्तित्वात नसलेले आहे.) वरील उतार्‍यावरून पाश्चात्त्य लोकांची इतिहासाविषयीची कल्पना कळून येते. लढाया, तह, राज्ये इत्यादी घटनांची कालानुक्रमे लिहिलेली माहिती, म्हणजे यांच्या मताने इतिहास होय. या अर्थाने असा घटनांचा कालानुक्रमे इतिहास लिहिलेला नाही. ही गोष्ट खरी आहे; परंतु इतिहास याचा अर्थ जर इतकाच असेल, तर त्याला एवढे महत्त्व देणेही व्यर्थच आहे. या सर्व घटनांचा अभ्यास करून भूतकाळाचा अभ्यास करावयाचा आणि त्यातूनच भविष्यकाळ निघत असतो. यामुळे भूतकाळाच्या अभ्यासाने भविष्यकाळाविषयीचे ज्ञान करून घ्यायचे, हा इतिहासाचा खरोखर उद्देश होय.  

१. सांस्कृतिक इतिहासावरूनच राष्ट्राचा भविष्यकाळ ठरणे

तात्पर्य असे की, कोणत्याही देशाचा इतिहास, म्हणजे केवळ त्या देशात घडलेल्या घटनांची सूची नव्हे, तर त्या सर्व घटनांत अद्यारूढ असणारा आत्मा तो इतिहासाचे खरे स्वरूप आणि घटना ही केवळ घटना. सांस्कृतिक इतिहासावरूनच राष्ट्राचा भविष्यकाळ ठरवता येतो. यामुळे घटनात्मक इतिहासाला भारतियांनी विशेष महत्त्व दिले नाही. ‘Love felt little inclination to….’ (प्रेमाला थोडासा कल वाटला.) ही गोष्ट खरीच आहे आणि त्यात लाज वाटण्यासारखे काहीच नाही; परंतु लिहिलेला इतिहास नाही, यावरून भारतियांनी इतिहास केलाच नाही. हे अजब तर्कट मात्र मॅकडोनेल यांनी स्वतःच केले म्हणून शोभले. पूर्वीची माहिती जर लिहिलेलीच नाही, तर अशा घटना घडल्या नाहीत, हे तरी कसे कळले ? ‘वाटले ते म्हटले !’, हा एक पाश्चात्त्य पंडितांचा एक स्वभाव असतो. तेही जाणून असतात की, आपण एक ठोकून दिले आहे; परंतु अस्मादिक पंडितांना गर्भातच कामदेवाप्रमाणे तदीय प्राध्यापकांनी उपदेश केला असतो,

‘यत्साहेबोऽब्रवीत् तत् सत्यम् ।’, म्हणजे ‘साहेब जे म्हणाले ते सत्य.’ ‘तदेवं ब्रह्म त्वं विद्धि ।’ (केनोपनिषद्, खण्ड १, श्लोक ५) म्हणजे ‘तेच ‘ब्रह्म’ असे तू जाण.’ यामुळे ‘India made no history’, (भारताने इतिहास घडवला नाही.) असे आमचेही पंडित बिनधास्तपणे प्रतिपादन करतात.

२. पाश्चात्त्य पंडितांची इतिहासाच्या अभ्यासाची हास्यास्पद संकल्पना

अलीकडे भौतिकशास्त्रामध्ये कोणत्याही एका पालटणार्‍या गोष्टीचा अभ्यास करावयाचा झाल्यास काही विशेष स्थितीचे निरीक्षण करून त्याचा एक आलेख (ग्राफ) बनवतात आणि एकंदर त्या आलेखाची पद्धत अन् वळण पाहून तो तसाच पुढे वाढवला असता त्याचा पुढे होणारा पालट समजू शकतो. याप्रमाणे इतिहास हा गतगोष्टींचा आलेख आहे. जसे आलेखामध्ये एखादा बिंदु विसंगत असल्यास तो सोडून सर्व सुसंगत रेषा काढतात, तसेच इतिहासामध्ये एखाद दुसरी विसंगत घटना सोडून सर्व सुसंगत घटनांचा आलेख बनवल्यास त्याचा आकार काय होतो, हे पाहून त्यावरून भविष्यकाळाविषयी निश्चय करणे, याचेच नाव इतिहासाचा अभ्यास ! आता यासाठी घेतलेले ते मूळ बिंदु ते जितके अधिक तितका आलेख अधिक योग्य असणार. उदाहरणार्थ आजारी माणसाने तापाचा (उष्णतामान) आलेख काढायचा आहे. जर केवळ दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत प्रती घंट्याला तापाचे प्रमाण बघून आलेख बनवला आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रती घंट्याला उष्णतामान घेऊन आलेख बनवला, तर अर्थात् दुसर्‍या आलेखावरून त्याच्या तापाच्या चढउताराची अधिक नीट कल्पना येईल, तसेच भूतकाळाची पद्धत कळण्यासाठी जो आलेख बनवावयाचा त्याकरता जितका विस्तृत भूतकाळ घेऊ तितका योग्य तो काढता येईल. पाश्चात्त्य पंडितांनी इतिहासाच्या अभ्यासासाठी काळच इतका थोडा घेतला आहे की, त्यामुळे त्यांना खरी कल्पना येणे तर बाजूलाच; पण विपरित कल्पना मात्र सुचते. रुग्णाचे घंट्यापूर्वी १००० (फॅरेनहाईट) उष्णतामान होते आणि आता १०३० अन् संध्याकाळपर्यंत ११२० पर्यंत जाईल, असे बेधडक सांगण्याप्रमाणेच एकंदर या पाश्चात्त्य इतिहास संशोधनाची पद्धत आहे. इ.स. पूर्वी ४००० वर्षे जग उत्पन्न झाले, ही बायबलची कल्पना ! आजच्या इतर शास्त्रांनी विरुद्ध पुरावा दिला, तरी पाश्चात्त्यांना ते सोडण्यास कष्ट होतात. अनंत काळाच्या इतिहासाच्या मानानेही ५ सहस्र वर्षे, म्हणजे इतकी अल्प होतात की, यावरून इतिहासशास्त्र बसवण्याचा यत्न करणे, हे वरील उदाहरणाप्रमाणेच हास्यास्पद होईल.

३. पाश्चात्त्यांच्या संशोधनाची पद्धत सदोषयुक्त !

असे असले, तरी काळ संकुचित घेऊनही इतिहासाचा व्यवस्थित अभ्यास करणे शक्य आहे. अर्थात् त्यासाठी बर्‍याच गोष्टींविषयी चूक न करण्याची दक्षता घ्यावी लागते. ती न घेतल्यामुळे पाश्चात्त्यांच्या संशोधनांत अनेक दोष उत्पन्न झाले आहेत आणि त्यांचे सदोष संशोधन शास्त्र तसेच घेऊन अभ्यास करण्याची सवय लागल्यामुळे भारतीय अन्य नियमांना अंधाप्रमाणे एकाच आंधळ्याच्या माळेत स्वतःसही गोवून ‘अंधाही सच है । नही भगवान ।’, असा घोष करत असतात. इतिहासाचे मूळ अभ्यासक मिशनरींना ‘सर्व ज्ञान ग्रीकांपासून प्राप्त झाले’, असे सांगतात. तेव्हा त्यांनी सर्व विश्वाचे प्रसुतीगृह ग्रीस ठरवले. तेव्हा कुठे काही नवीन आढळले की, ते ग्रीकांपासून घेतले, हे त्यांनी ठरवले. त्याकरता त्यांना थोडेसे साम्य दिसले म्हणजे पुरते; पण दोन गोष्टी समान असल्या, तर तेथे कुणीतरी कुणापासून घेतलेच असले पाहिजे, हीच मुळांत चुकीची कल्पना; कारण दोघांना स्वतंत्रपणे एकच कल्पना सुचणे अशक्य थोडेच आहे ? तरीही समजा कसेही धरून चालले की, कुणीतरी कुणापासून घेतले, तरी केवळ सादृश्यावरून अमक्यानेच अमक्याकडून घेतले, हे ठरू शकणार नाही. पाश्चात्त्य संशोधक मात्र या संदर्भात असे ठाम समजून चालतात की, ‘हिंदुस्थानातील लोकांनीच बाहेरून घेतले असले पाहिजे’, असा दुराग्रह उराशी बाळगून ते वेदांचा अभ्यास करावयास बसले. तेव्हा त्यांना ग्रीक आणि आर्य यांच्यात काही सारख्या गोष्टी आढळल्या.

अर्थात् आर्यांनी त्या गोष्टी ग्रीकांपासून घेतल्या, हे त्यांचे गृहितक आहे; परंतु उपलब्ध इतिहासात आर्य तेथे गेल्याचा अथवा ग्रीक इकडे आल्याचा पुरावा नाही. तेव्हा अर्थापत्तीप्रमाणाने या दोघांचे पूर्वज एका ठिकाणी कुठे तरी असले पाहिजेत आणि नंतर तेथून ते फुटले असावेत. या गोष्टीचा काळ ख्रिस्ताब्द पूर्व १ सहस्र वर्षे असावा. यानंतर ‘वेद, ब्राह्मण, सूत्र, स्मृति इत्यादी ग्रंथात भाषा, वर्णने इत्यादी गोष्टींचा भेदावरून ते ग्रंथ अधिकाधिक अलीकडचे असावे’, असे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाने दिसते. यांत भेद किती असावा ? तर प्रा. मॅक्समूलर यांनी २००-२०० वर्षांचा भेद असावा, असे अभ्यासाच्या सोयीसाठी मानले. ही गोष्टही त्यांनीच स्पष्ट नमूद केली आहे; परंतु ती आता मात्र ब्रह्मवाक्याप्रमाणेच स्वप्रमाण बनल्यासारखी झाली आहे.

नुकतेच सिंधमध्ये जे उत्खनन झाले त्यात एकावर एक ७ शहरे सापडली आणि आश्चर्याची गोष्ट ही की, त्या सर्व शहरांच्या रचनेवरून त्यांच्यात जवळजवळ मुळीच कालभेद नव्हता, असे वाटण्याइतके त्यांच्यात साम्य आहे. आता एक शहर गडप होऊन दुसरे वसण्यास शे-दोनशे वर्षांचा जरी किमान काळ घेतला, तरी पहिल्या आणि ७ व्या शहरात दीड सहस्र वर्षांचा भेद मानावा लागेल. इतक्या वर्षात रचनेवरून काहीच उमजून पडणारा भेद दिसत नाही. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, पाश्चात्त्यांचे इतरत्र खरे ठरणारे नियम लागू होत नाहीत, तसेच या उत्खननातील तज्ञ सर र्जान मार्शल यांनी स्पष्ट उद्घोषित केले आहे की, या ७ शहरांतील संस्कृती ही किमान ६ सहस्र वर्षांपूर्वीची असलीच पाहिजे, तसेच ज्योतिर्गणिताच्या अधिक विश्वसनीय पुराव्याने लोकमान्य टिळक यांनी ‘वेदांचा काळ ख्रिस्ताब्द पूर्व ४ सहस्र वर्षांच्या अलीकडे येत नाही’, असे दाखवले. हे जरी शास्त्रीय पुरावे रगेलपणाने नजरेआड करून पाश्चात्त्य पंडित स्वतःचे पूर्वीचेच बिनबुडाचे सिद्धांत आमच्यावर लादून संशोधन चालवत असतात.

४. राष्ट्राचा इतिहास राष्ट्राविषयी जिव्हाळा असणार्‍या लोकांनी लिहिण्यामागील महत्त्व

इतिहासाचे खरे कार्य, म्हणजे उपलब्ध होणार्‍या घटनांच्या तळाशी जो संस्कृतीचा अंतःप्रवाह वहातो तो ओळखून त्या त्या राष्ट्राच्या विकासाची रूपरेखा दाखवणे, हे होय. असे झाले, तरच इतिहासावरून त्या राष्ट्राचा वांशिक आत्मा (racial spirit) कायम ठेवणे, म्हणजेच राष्ट्र कायम ठेवणे होय. म्हणून आज राष्ट्र जिवंत ठेवायचे असेल, तर स्वतःचा वांशिक आत्मा ओळखून तो कायम ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि तो प्रयत्न इतिहासाच्या अभ्यासानेच होऊ शकतो. हे ओळखूनच भारतियांनी मुख्यतः सांस्कृतिक इतिहास लिहिला. घटनात्मक इतिहास असा म्हणण्यासारखा लिहिला गेलाच नाही आणि जो लिहिला गेला, तो पाश्चात्त्यांच्या अनुयायांकडून लिहिला गेला. त्यामुळे लाभापेक्षा हानी मात्र अधिक झाली आहे. याचे कारण हे इतिहासकार केवळघटना नमूद करून स्वस्थ न बसता स्वकल्पनाशक्तीच्या जोरावर त्यात संगती लावण्याचा प्रयत्न करतात आणि ‘विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम् ।’ म्हणजे ‘करायची होती गणपतीची मूर्ती; पण झाली वानराची !’, अशी शिल्पकला प्रकट करतात.

राष्ट्राचा इतिहास त्या राष्ट्राविषयी जिव्हाळा असणार्‍या लोकांनीच लिहिला पाहिजे, तरच सत्य कळेल. एरव्ही कळणे शक्य नाही. इतिहासाचा अभ्यास करतांना आपल्या कल्पना पूर्वीच्या लोकांवर लादून त्यांच्या कृत्यांचे परीक्षण करावयाचे नसते. त्यांच्या कल्पना काय होत्या ? हेच शोधून काढणे आपले कर्तव्य होय आणि तशा कल्पना असता त्यांची कृत्ये तद्नुसार योग्य वा अयोग्य ठरतात, याचा विचार होईल. उदाहरणार्थ सतीची चाल ही रानटी होय, असे आज समजतात; परंतु पूर्वी जेव्हा स्त्रिया सती जात, तेव्हा ‘आपण सहगमन करत आहोत’, अशा तर्‍हेने मोठ्या आनंदाने त्या अग्नीप्रवेश करत असत. अग्नीने अंग जळत असताही ज्यांना त्याचे भान रहात नाही इतकी दृढ श्रद्धा असल्यावर त्यांना सती जाऊ देणे, यात रानटीपणा कसा म्हणता येईल ?’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– कै. न. ना. भिडे, पुणे (साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३)