सातारा, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रतिवर्षीप्रमाणे ‘शिवजयंती महोत्सव समिती’च्या वतीने यावर्षीही ‘शिवजयंती महोत्सव-२०२४’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच घोडे आणि १०० कलाकार यांचा सहभाग असलेला नेत्रदीपक शिवजयंती सोहळा सातारावासियांना अनुभवायला मिळणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘१७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथे शाहीर नंदेश उमप निर्मित शिव-सोहळा हा ऐतिहासिक कार्यक्रम होईल. त्यात शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत घटना पहाता येतील. यानंतर ‘जाणता राजा’ हा १०० कलाकारांचा कार्यक्रम होईल. १८ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजता अजिंक्यतारा गडावर ‘मशाल महोत्सवा’चे आयोजन केले आहे. नंतर उल्लेखनीय कार्य करणार्या सातारावासियांचा सत्कार होईल. १९ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजता गांधी मैदान येथून शोभायात्रा निघेल. शोभायात्रेचा समारोप शिवतीर्थ (पोवई नाका) येथे होणार आहे. शिवतीर्थावर रात्री ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती होऊन फटाक्यांची आतषबाजी होईल.’’