संपादकीय : जर्मनीची गरुडझेप !

जगातील अर्थव्यवस्थेत पहिल्या ५ क्रमांकांवर असणार्‍या देशांमध्ये चढाओढ दिसून येते. या स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जपानला त्याचे स्थान गमवावे लागले असून तो मान जर्मनीने प्राप्त केला आहे. जर्मनी जगातील अर्थव्यवस्थेच्या तिसर्‍या क्रमांकावर पोचली आहे. जर्मनी हा युरोपमधील सर्वांत मोठा उद्योगप्रधान देश आहे. जपानचा जीडीपी दर (सकल देशांतर्गत उत्पादन) ४.२, तर जर्मनीचा जीडीपी दर ४.५ ट्रिलियन डॉलर्स आहे. सध्या अमेरिका जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून यशोशिखरावर आहे. अमेरिकेचा जीडीपी दर २७ ट्रिलियन डॉलर्स आहे, तर १७ ट्रिलियन डॉलर्स दर असणारा चीन दुसर्‍या क्रमांकावर आहे. चीन आर्थिक प्रगतीसाठी शर्थीचे प्रयत्न करत असून पुढील काही वर्षांत जगातील सर्वांत मोठी आर्थिक व्यवस्था बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. या दोन्ही मोठ्या अर्थव्यवस्था अर्थिक प्रगतीसाठी प्रचंड संघर्ष करतच आहेत. यंदा जर्मनीला जरी तिसरा क्रमांक मिळाला असला, तरी याआधी काही काळ देशाला सौम्य प्रकारच्या मंदीचा सामना करावा लागला होता; पण त्यावर मात करत जर्मनीने अर्थव्यवस्थेत गरुडझेप घेतली. त्यामुळे जर्मनीने हे स्थान मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि घेतलेले निर्णय यांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त आहे.

मंदीच्या गर्तेत जपान !

जपानमध्ये सध्या मंदी आहे. याच्या जोडीला ब्रिटनही मंदीचा सामना करत आहे. बँक ऑफ जपानने वर्ष २०१६ मध्ये खर्च आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन देण्यासाठी नकारात्मक व्याजदर लागू केले. त्यानंतर व्याजदरात कोणतेच पालट झालेले नाहीत. त्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांसाठी तेथील ‘येन’ या चलनाचे मूल्य न्यून झाले. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत येनचे मूल्य घसरले, हे जपानच्या अपयशामागील एक कारण समजले जाते. जपानमध्ये सध्या कामगार टंचाईची समस्याही भेडसावत आहे. यावर जपानकडे ‘इमिग्रेशन’ (कायमचे वास्तव्य करण्यासाठी विदेशातून येणे) हाच पर्याय आहे; पण परदेशी कामगारांना स्वीकारण्याची जपानची सिद्धता नाही. वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी कर्ज घेण्याच्या खर्चातही जपानने वाढ केली आहे. अल्प होणारा जन्मदर आणि घटती लोकसंख्या जपानच्या अपयशास कारणीभूत आहे. अस्थिरता, अनिश्चितता, जटीलता आणि संदिग्धता ही सूत्रे कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तितकीच महत्त्वपूर्ण ठरतात.

जर्मनीला मुकुट का मिळाला ?

जर्मनीतील लोकसंख्या जरी अल्प झाली असली, तरी तेथील अर्थव्यवस्था स्थिर आहे. ती अन्य देशांप्रमाणे डळमळीत किंवा वर-खाली झालेली नाही. काही वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये मोठ्या प्रमाणात निर्वासितांनी आश्रय घेतला होता. याला कंटाळून १ लाख ३८ सहस्र जर्मन नागरिकांनी देश सोडून अन्य देशांमध्ये स्थलांतर केले होते. अर्थात् अशाने समस्या काही सुटली नाही; कारण याचा अपलाभ शेवटी निर्वासित किंवा आतंकवादी यांनी घेतला. ‘इसिस’च्या माध्यमातून त्याचा प्रत्यय आला; पण या सर्वांचा सामना करणारा आणि ‘जिहाद नको; पण विकास हवा. त्यामुळे राष्ट्रासाठी काहीतरी करावे’, अशी मनोवृत्ती असणारा एक गट येथे अस्तित्वात आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांतील समृद्धताच त्यांना यशाकडे नेत आहे. एक गट असाही आहे की, ‘मी बरे, माझे काम बरे, राष्ट्राच्या विकासाशी माझे देणेघेणे नाही.’ असे जरी असले, तरी या गटाच्या कार्यकुशलतेमुळे अर्थव्यवस्थेचे द्वार त्यांच्यासाठी नेहमीच खुले असते. भ्रष्टाचाराचे प्रमाणही अन्य देशांच्या तुलनेत जर्मनीत नगण्य आहे. जरी भ्रष्टाचार झालाच, तरी तो रोखण्याची क्षमताही जर्मनीमध्ये आहे. विकास घडवणे ही मोठी आणि किचकट प्रक्रिया आहे; पण जर्मनीने ती महत्प्रयासाने केली. जर्मनीच्या नागरिकांची कष्ट घेण्याची सिद्धता त्याच्या भरारीचा मापदंड ठरली !

जर्मनीत चारचाकी वाहननिर्मिती करण्याचा उद्योग, त्यासाठी लागणारे कौशल्य आणि तंत्रज्ञान हे सर्वच उत्तम प्रकारे अवगत आहे. भारतातील ‘मेक इन इंडिया’च्या प्रकल्पाच्या दृष्टीने जर्मनीचा आदर्श घ्यायला हवा. तंत्रज्ञानाच्या जोरावर तिने अनेक क्षेत्रांत आज नेत्रदीपक प्रगती केली आहे. संरक्षणविषयक उत्पादनात जर्मनी पारंगत असल्याने त्याने मध्यंतरी भारतासमवेत काम करण्यासाठी रस दाखवला होता. कोणत्याही देशातील यंत्रसामुग्रींमध्ये जर्मनीची यंत्रसामुग्री सर्वश्रेष्ठ म्हणून सिद्ध झालेली आहे. कोणत्याही उत्पादनाचा दर्जा उत्तम असणे आणि त्याद्वारे ग्राहकांची विश्वासार्हता टिकवून ठेवणे महत्त्वाचे असते. जर्मनीने हे साध्य केले आहे. पायाभूत विकास करण्यात जर्मनी सर्वांत अग्रेसर म्हणून गणला जातो. जर्मनीने अर्थव्यवस्था उंचावण्यासाठी जगातील अन्य देशांना स्वतःकडे आकर्षित करण्याकडे लक्ष दिले. या अंतर्गत पर्यटनवृद्धी करणे, निर्यातीवर अधिक भर देणे असे केल्याने अर्थव्यवस्थेत अधिकाधिक भर पडत गेली. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी जर्मनी हे अत्यंत प्रबळ राष्ट्र होते; पण दुसर्‍या महायुद्धात जर्मनी बेचिराख झाला. स्वबळ असे काहीच उरले नसतांना जर्मनीने मोठा संघर्ष केला. सर्व क्षेत्रांत नाव कमावण्यासाठी अथक परिश्रम घेत स्वअस्तित्वाची पुनर्निर्मिती करून दाखवत तिसर्‍या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर जर्मनीने स्वतःचे नाव कोरून दाखवले. जर्मनीने ‘फिनिक्स’ पक्षाप्रमाणे भरारी घेतली, हे स्तुत्यच आहे. हिटलरच्या हुकूमशाहीच्या बळावर सर्व जनता जीवन जगत होती, हे जर्मनीतील कोणे एकेकाळचे चित्र होते. हीच हुकूमशाही त्यागून विकासाच्या बळावर यश मिळवणारा जर्मनी देश सर्वांसाठीच आदर्श ठरत आहे.

भारत आणि अर्थव्यवस्था !

भारतालाही अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देण्यासाठी नवनवीन संधी प्राप्त होत आहेत. भारत त्या संधींचा लाभ घेऊन भरारी घेण्याचा प्रयत्नही करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था वर्ष २०२६ मध्ये जपान आणि २०२७ मध्ये जर्मनीला मागे टाकेल अन् जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या सूचीत सामील होईल. सध्या जगातील सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांच्या सूचीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. अर्थव्यवस्थेतील स्थिरत्व, बळकटी, वाढती परदेशी गुंतवणूक, वाढता जीडीपी आणि विकासदर या सूत्रांच्या आधारे फलदायी ठरत पहिल्या ३ क्रमांकांपैकीचा एक मुकुट भारताच्या शिरपेचात निश्चित रोवला जाईल, यात शंका नाही. भारत ही गतीमानता लवकरच साध्य करील !

हिटलरची हुकूमशाही अनुभवलेल्या जर्मनीने अर्थव्यवस्थेचा तिसरा क्रमांक गाठणे, हे राष्ट्रोत्कर्षासाठीच्या परिश्रमांचे गमक !