संन्यास म्हणजे काय ?

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 १. शंका : संन्यास म्हणजे संसारातून पळून जाणे का ?

उत्तर : नाही. ही पळवाट नाही, तर हे दुर्दम्य साहस आहे; कारण एकटे, एकाकी होणे आणि संपूर्ण अपरिग्रही रहाणे, हे तर पळपुट्याला शक्यच नाही. हे धाडस केवळ उत्कट मुमुक्षू असलेलाच करू शकतो. संसार म्हणजे जन्म-मरणाचे अखंड घुमणारे चक्र. या जन्म-मरणातून मुक्तता करून घेण्याची उत्कटता बळावली की, साधक आत्मसाक्षात्काराकडे वाटचाल करू लागतो. त्यासाठी अर्थातच सर्व वेळ योग साधनेत, आत्मचिंतनात घालवावा लागतो. अशा परिस्थितीत साधनेला आवश्यक असे वातावरण आणि परिस्थिती निर्माण करण्याकरता जर संन्यास अनुकूल आणि आवश्यक असेल, तर तो अवश्य घ्यावा, नव्हे घ्यावाच.

२. शंका : संन्यास घेण्यापूर्वी काही पूर्वसिद्धता करावी लागते का ?

उत्तर : हो, नक्कीच करावी लागते. साधक आरंभीला वर्णाश्रमाचे शास्त्रीय कर्म करतो, म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म करतो. काम्य आणि निषिद्ध कर्म टाकतो. नित्य नैमित्तिक कर्मही निष्काम करतो. योग साधना करतो. ध्यान करतो. हळूहळू वासना विलीन होत जातात आणि आसक्ती गळत जाते. घरदार, बायको, धन-दौलत, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्यांची आसक्ती निघून जाते. मनमानी करणार्‍या इंद्रियांना प्रत्याहाराने शुद्ध करतो. कर्माचे फळ भगवंताला अर्पण करतो. सद्गुरूंच्या आश्रयाने आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्नांची शिकस्त करतो.

३. शंका : मग येथे संन्यास कुठे आहे ?

उत्तर : मुमुक्षूला आता पुढची वाटचाल करायची असते. पुढचा अभ्यास करायला त्याला एकांत हवा असतो. ही सगळी पूर्वसिद्धता झाल्यावरच योगसाधनेला आवश्यक असे वातावरण निर्माण करण्यासाठी संन्यास अनुकूल असतो. एवढेच नव्हे, तर तो आवश्यक असतो.

४. शंका : पुढे काय घडते ?

उत्तर : मुमुक्षू आता वनात एकांतात, पवित्र स्थळी एकटाच रहातो. एकटाच अभ्यास करतो; कारण दुसरे कुणी आले की, स्वातंत्र्याचा संकोच ! भय ! तो वृत्तीशून्य होण्याचा सतत अभ्यास करत रहातो. पहिली वृत्ती मावळते. दुसर्‍या वृत्तीचे गर्भाधान व्हायचे असते. अशा मधल्या संधीकालातील परमविश्रांती आणि परमशांती तो अनुभवतो. शरीर निर्वाहापुरतेच हात-पाय हलवतो. वैराग्य हाच त्याचा साथीदार असतो. आता तो जगाची पर्वा (फिकीर) करतच नाही. सगळे जग त्याच्या विरुद्ध असले, तरी एकट्यानेच जगायची त्याची सिद्धता असते. असा सतत आत्मचिंतन करणारा संन्यासी स्वतः पवित्र होतोच; पण तो समाजालाही पवित्र करतो. त्याच्यामुळे सारा आसमंत पावन होतो. अशा संन्यासी, योगी आणि ज्ञानीयाची सेवा परम भाग्यानेच लाभते.

५. कर्मयोग्याला जे साधत नाही, ते अद्भुत कर्म हे संन्यासी करतात. चिंतेने, दुःखाने, तणावाने, संसारतापाने आत्महत्याच करायची बाकी उरली आहे. अशा कित्येकांना या संन्याशांनी जीवन दिले. त्यांचे ऋण कसे फेडाल ?

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२३)

साहसी संन्याशांवर समाज अवलंबून असतो !

‘हे दुर्दम्य साहसी संन्यासी (एकटे, एकाकी, अपरिग्रही) समाजावर अवलंबून नाहीत, तर समाज त्यांच्यावर अवलंबून आहे. संन्यासी रामतीर्थ म्हणतात, ‘‘माझ्यामुळेच तर ही धरणी धारण करू शकते. माझ्याकरताच सूर्य आणि चंद्र उगवतात. माझ्याकरताच वारे, नद्या वहातात आणि पाऊस पडतो.’

– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२३)