सिंधुदुर्ग : हानीभरपाई मिळण्यासाठी पूरग्रस्त विलवडेवासियांची आंदोलन करण्याची चेतावणी !

प्रशासनाकडून पुन्हा एकदा आश्वासन देऊन बोळवण !

(प्रतिकात्मक चित्र)

सावंतवाडी : वारंवार उपोषणे, आंदोलने करूनही विलवडे येथील पूरग्रस्तांना अद्यापपर्यंत हानीभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी येथील तहसील कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना खडसावले. यापूर्वी प्रशासनाने, ‘हानीभरपाई लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले होते, तसेच आश्वासन पुन्हा देऊन विलवडेवासियांची बोळवण केली. त्यामुळे ‘प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्हाला भरपाई मिळवून द्या, अन्यथा आंदोलन करू’, अशी चेतावणी देण्याची वेळ ग्रामस्थांवर आली.

विलवडे गावात वर्ष २०१९ ते २०२१ या कालावधीत तेरेखोल नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरे, शेतीचे साहित्य यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. ही हानीभरपाई मिळावी, यासाठी ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२४ या दिवशी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्या वेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी ‘हानीभरपाई लवकरात लवकर देण्यासाठी प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले होते; मात्र अद्यापपर्यंत हानीभरपाई मिळाली नसल्याने पूरग्रस्तांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांची भेट घेतली. या वेळी चव्हाण यांनी ‘पूरग्रस्तांची सूची बनवून जिल्हाधिकार्‍यांकडे पाठवली आहे. याचा पाठपुरावा घेऊन लवकरात लवकर हानीभरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले.

संपादकीय भूमिका

जनतेला वारंवार आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन जनहितकारी कारभार काय करणार ?