विवाह भोजनातील काटकसर !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘व्हॉट्सॲप’वर फिरत असलेल्या एका ‘पोस्ट’मधून जैन आणि अग्रवाल समाजाने एक निर्णय घेतल्याचे नुकतेच समोर आले. या निर्णयानुसार विवाह भोजनात सहाच पदार्थ ठेवण्यात यावेत. त्यापेक्षा अधिक पदार्थ ठेवण्यात आले, तर वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या; मात्र भोजन करायचे नाही. आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न असलेल्या एखाद्या समाजाने असा निर्णय घेणे सर्वांनाच विचार करण्याला प्रवृत्त करणारा आहे. सध्या विवाहाच्या भोजनात अधिकाधिक पदार्थ ठेवण्याची अघोषित स्पर्धा चालू आहे. अशा वातावरणात घेतलेला हा निर्णय धारिष्ट्याचा आणि म्हणून स्वागतार्ह आहे !

विवाहाला आलेल्या पाहुण्यांसाठी सध्या खाण्यातील कुठला पदार्थ नसतो असे नाही. महागड्या लग्न सभागृहात हे प्रमाण अधिक असते. जसे ज्याला परवडेल, त्याप्रमाणे यात अल्प-अधिक होते; परंतु सध्या इतके पदार्थ असतात की, खाणार्‍याला काय खायचे नि काय नाही ? असाही प्रश्न पडतो. जेवणाच्या आधीच एवढे खाल्ले तर जेवणार काय ? असेही वाटते. थंड पेयाचे विविध प्रकार, अनेक प्रकारचे ‘स्टार्टर’ (जेवण ग्रहण करण्यापूर्वी देण्यात येणारा हलका आहार), हे लग्नाच्या सभागृहात हातात दिले जातात. सकाळच्या न्याहारीला एकापेक्षा अधिक पदार्थ असतात. काही जण त्यात विविध फळे, ज्यूस असेही ठेवतात. जेवणात सूप, विविध सॅलेड आणि भाज्या, पोळ्या, पराठे यांचे प्रकार, विविध प्रकारचे चायनीज पदार्थ, अनेक गोड पदार्थ, विविध प्रकारची आईस्क्रिम आणि केक आदी पाश्चात्त्य पदार्थ आदी अनेक पदार्थांचाही मेळावा असतो. एकीकडे पंगत असते आणि दुसरीकडे ‘बुफे’ (स्वतः वाढून घेऊन उभे राहून जेवणे). असा मोठा जेवणाचा थाट, म्हणजे काही जणांचा यात एका बाजूने स्वतःची श्रीमंती दाखवण्याचाही असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाण्याची दाट शक्यता असते. अधिक पदार्थ उरणे किंवा पानात पदार्थ टाकले जाणे, याचे प्रमाण अधिक पदार्थांमुळे वाढते. आपण अन्न हे ‘पूर्णब्रह्म’ मानतो. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने माणसाला दैनंदिन आयुष्य निरोगी जगण्यासाठी आवश्यक ऊर्जा, चैतन्य, शक्ती या अन्नातून मिळत असते. योग्य आहारातून ज्याप्रमाणे पोषकतत्त्वे मिळतात, त्याप्रमाणे अयोग्य आहारातून शारीरिक हानीही होते. आजही दीर्घायुषी व्यक्ती ही योग्य आहार करणारी असते, हे आपल्या लक्षात येईल. समाजात अजूनही एक वेळच्या अन्नाला मुकलेला वर्ग आहे. हिंदु धर्मानुसार अन्नदान हे श्रेष्ठदान आहे. याचा विचार करून योग्य पदार्थांच्या रूपाने अन्नदान झाले, तर त्याचा यजमान आणि पाहुणे दोघांनाही शारीरिक अन् आध्यात्मिक दृष्ट्या लाभ होतो. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या लक्ष्मीरूपी संपत्तीचा योग्य विनियोग करून तिचा मान ठेवायला हवा.

– सौ. स्नेहा रूपेश ताम्हनकर, रत्नागिरी