नम्र आणि भावपूर्ण सेवा करणारे चेन्नई येथील श्री. नंदकुमार !

‘चेन्नई येथे अलीकडेच एक नवीन साधना सत्संग चालू झाला आहे. त्या सत्संगात श्री. नंदकुमार नियमितपणे उपस्थित असतात. त्यांची मला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. बालाजी के

१. समाधानी वृत्ती

श्री. नंदकुमार हे माझे व्यावसायिक मित्र आहेत. आमच्या व्यावसायिक मंडळींपैकी बरेच लोक त्यांच्याविषयी सांगतात, ‘‘श्री. नंदकुमार साधे आणि निरागस आहेत. ते अधिक पैसे कमवू शकणार नाहीत.’’ श्री. नंदकुमार त्यांना नम्रपणे सांगतात, ‘‘मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतो. मी जे कमावतो, त्यात मी समाधानी आहे. माझ्या प्रारब्धात जे आहे, ते मला मिळणारच आहे.’’

२. श्री. नंदकुमार साधना आणि सेवा करायला लागल्यापासूनच भावपूर्ण साधना अन् सेवा करतात.

३. प्रायोजकांकडे सनातन पंचांग देण्याची सेवा भावपूर्ण करणे

३ अ. सनातन पंचांग पायाजवळ ठेवावे लागू नये, यासाठी ‘स्कूटी’ऐवजी ‘मोटरसायकल’ घेणे : जानेवारी २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात एका प्रायोजकाकडे सनातन पंचांग पोचवायचे होते. ते प्रायोजक आमच्या घरापासून २५ कि.मी.च्या अंतरावर रहात होते. एरव्ही श्री. नंदकुमार ‘स्कूटी’वरून (दुचाकीवरून) सेवा करतात; मात्र त्या दिवशी त्यांनी ‘मोटरसायकल’ आणली. मी श्री. नंदकुमार यांना विचारले, ‘‘सनातन पंचांगांचा गठ्ठा मोटरसायकलच्या पेट्रोलच्या टाकीवर ठेवून घेऊन जाणे कठीण होणार नाहीका ?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘स्कूटी’वर आलो असतो, तर सनातन पंचांगांचा गठ्ठा पायाजवळ ठेवावा लागला असता आणि माझे पाय सनातन पंचांगांना लागले असते.’’ श्री. नंदकुमार यांनी प्रायोजकांना सनातन पंचांग देण्यासह त्यांना नामजप, सत्संग आणि सनातनचे ग्रंथ यांविषयीही माहिती सांगितली.

३ आ. अन्य प्रायोजकांनी त्यांनी मागणी केलेले सनातन पंचांग स्वीकारण्यास विनाकारण विलंब करणे, साधकाला ‘नवीन प्रायोजक कसे मिळणार ?’, अशी काळजी वाटणे आणि त्याने गुरुदेवांना प्रार्थना करणे : सनातन पंचांगांची मागणी केलेले अन्य प्रायोजक सनातन पंचांग स्वीकारायला विनाकारण विलंब करत होते. त्यामुळे मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही सनातन पंचांग घेणार नसाल, तर मी अन्य प्रायोजकांना संपर्क करून त्यांना सनातन पंचांग देईन.’’ नंतर मला ‘माझे बोलणे अयोग्य होते’, याची जाणीव होऊन खंत वाटली. मला ‘नवीन प्रायोजक कसे मिळणार ?’,

अशी काळजी वाटत असल्याने मी गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) शरण जाऊन प्रार्थना केली. दुसर्‍या दिवशी श्री. नंदकुमार यांनी ज्या प्रायोजकांना सनातन पंचांग पोचवले होते, त्यांनी आणखी सनातन पंचांग मागवले. ‘श्री. नंदकुमार यांनी केलेली भावपूर्ण सेवा गुरूंच्या चरणी रुजू होऊन त्याचे फळही मिळाले’, हे माझ्या लक्षात आले आणि ‘भावपूर्ण सेवा कशी करावी ?’, हे श्री. नंदकुमार यांच्या माध्यमातून शिकवल्याबद्दल मी श्री गुरुदेवांच्या चरणीकृतज्ञ आहे.’

– श्री. बालाजी के., चेन्नई, तमिळनाडू. (२.२.२०२२)