दौंड (जिल्हा पुणे) येथील साधक श्री. संतोष चंदुरकर यांचा साधनाप्रवास !

श्री. संतोष चंदुरकर

१. दोन संप्रदायांच्या सत्संगाला जाऊनही मनातील देवाविषयीच्या प्रश्नांची योग्य उत्तरे न मिळणे आणि त्यामुळे साधनेपासून दूर जाणे

‘मी बुद्धीवादी असल्याने माझ्या मनातील ‘देव आहे का ? असल्यास तो कुणी पाहिला आहे का ?’, या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळाली नसल्याने मी इतरांना सांगत असे, ‘‘मी देव पाहिला नाही आणि तुम्ही मला तो दाखवू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या आई-वडिलांना देव मानतो; कारण ते मला दिसतात अन् त्यांच्यामुळेच मी पृथ्वीवर जन्म घेतला आहे.’’

सनातन संस्थेमध्ये येण्याआधी मी २ संप्रदायांच्या सत्संगांत जाऊन साधना करत होतो; परंतु तेथे केवळ श्रवणभक्ती असे. तेथे माझ्या देवाविषयीच्या जिज्ञासेला योग्य उत्तरे मिळाली नाहीत आणि त्यामुळे मी साधनेपासून दूर जात होतो.

२. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ

२ अ. नातेवाइकांकडून सनातन संस्थेची माहिती मिळणे आणि सनातनच्या सत्संगातून पत्नीकडून साधनेविषयी नेमकी उत्तरे मिळणे : वर्ष १९९९ मध्ये माझे मेहुणे आणि मेहुणी यांच्याकडून मला सनातन संस्थेची माहिती मिळाली अन् आम्ही दोघे सत्संगाला जाऊ लागलो. सत्संगाला माझी पत्नी जात असे. मी ‘तिला नेणे-आणणे आणि जोपर्यंत सत्संग असायचा, तोपर्यंत माझ्या लहान मुलाला सत्संगाच्या बाहेर सांभाळणे, त्याच्याशी खेळणे’, या सेवा करत असे. सत्संग संपल्यावर माझी पत्नी सत्संगामध्ये तिला सांगितलेली सूत्रे मला सांगत असे. त्यातून मला ‘साधना म्हणजे नेमके काय ? प्रत्येक देवाचे नाव नेमके तेच का असते ? त्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण काय ?’, या प्रश्नांची नेमकी उत्तरे मिळत गेली.

२ आ. सेवेचा आरंभ : वर्ष २००० मध्ये औंध (जिल्हा पुणे) येथे मी सेवेला आरंभ केला. ‘सनातनच्या ग्रंथांचा साठा सांभाळणे, साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करणे, ग्रंथ वितरण कक्ष (स्टॉल) लावणे, साप्ताहिकाच्या अंकांचे वितरण करणे’ इत्यादी सेवा मी करत असे. वर्ष २००३ मध्ये माझे स्थलांतर (बदली) दौंड (जिल्हा पुणे) येथे झाले.

२ इ. दौंड गावात नवीनच असूनही साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतांना लोकांशी जवळीक निर्माण होणे आणि अल्प कालावधीमध्ये साप्ताहिकाचे वर्गणीदार वाढणे : आम्ही दोघे दौंड गावात नवीनच होतो. आमच्या संपर्कातील व्यक्तींना आम्ही आणि सनातन संस्था नवीनच होते; परंतु ‘गुरु आमच्याकडून सर्व कार्य करून घेत आहेत’, असा आमचा भाव होता. वर्षभर आम्ही साप्ताहिकाचा अंक देत असतांना लोकांना अंकातील महत्त्वाची सूत्रे सांगत असू आणि पुढील अंक देतांना ‘अंक वाचला का ?’, अशी विचारपूस करत असू. त्यामुळे आमच्यात एक प्रकारची जवळीक निर्माण झाली. ते आम्हाला त्यांच्या ओळखीचे व्यापारी, नातेवाईक, मित्र आणि दुकानात येणारे गिर्‍हाईक यांचे संपर्क देत असत. गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये साप्ताहिकाचे वर्गणीदार वाढू लागले.

३. वर्ष २००४ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी गावातून सर्व संप्रदाय, भजनी मंडळे इत्यादींना एकत्र घेऊन सनातनच्या वतीने नामदिंडीचे आयोजन करण्यात येणे आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रतिवर्षी ही नामदिंडी चालू असणे : एकदा सनातनच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी सर्व संप्रदाय, भजनी मंडळे, गणेशोत्सव मंडळे आणि समाजातील प्रतिष्ठित हिंदुत्वनिष्ठ व्यक्ती यांना एकत्र घेऊन नामदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच गावातील सर्व संप्रदायांतील साधक शिस्तबद्धरित्या भगवे ध्वज हाती धरून नाम घेत आणि हिंदुत्वाचा जयजयकार करत नामदिंडीत एकत्रित आले. ही नामदिंडी सर्वांना आदर्श वाटली. वर्ष २००४ पासून आजपर्यंत अशीच ‘सर्व संप्रदाय नामदिंडी’ प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी गावातून निघते.

४. सनातनच्या वतीने ‘अंधश्रद्धा निर्मूलन कायद्या’च्या विरोधात जनप्रबोधन करून सर्व संप्रदाय आणि हिंदुत्वनिष्ठ पक्ष यांना एकत्र घेऊन गावात फेरीचे नियोजन करणे अन् त्यामुळे सनातनकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन सकारात्मक होणे

‘अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कसा चुकीचा आहे आणि त्या कायद्यामुळे हिंदु धर्म अन् त्याच्या रूढी-परंपरा यांवर होणारे परिणाम’, याबद्दल गावात ठिकठिकाणी सनातनच्या वतीने जनप्रबोधन करण्यात आले. सर्व संप्रदायांतील प्रमुख, प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच गावातील काही हिंदुत्वनिष्ठ पक्षांचे प्रमुख यांना एकत्र घेऊन त्या कायद्याच्या विरोधात गावातून फेरी काढण्याचे नियोजन करण्यात आले. त्या वेळी गावात आम्ही दोघेच सनातनचे साधक होतो. या फेरीमुळे लोकांचा आमच्याकडे, तसेच संस्थेकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला. हे सर्व केवळ गुरुकृपेमुळे शक्य झाले.

५. साधक आणि त्याचे कुटुंबीय वेगवेगळ्या ठिकाणी रहात असूनही गुरुकृपेने सुखरूप अन् सेवारत असणे

नंतर मी नोकरीनिमित्त नगरला, पत्नी दौंडला आणि मुलगा उच्च शिक्षणासाठी पुण्याला रहात होतो; परंतु गुरुकृपेने आम्ही तिघेही सुखरूप अन् सेवेत होतो. या कालावधीत आम्ही कितीतरी वेळा अपघात होता होता वाचलो, तसेच काही वेळा अपघात होऊनसुद्धा आम्हाला साधे खरचटलेही नव्हते. या सर्व प्रसंगांचा परिणाम म्हणून ‘साप्ताहिकाचा अंक वर्गणीदारांना वेळेत मिळाला नाही’, असे कधी झाले नाही. ही गुरुकृपाच आहे.

६. घराचे बांधकाम आणि त्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

६ अ. घराच्या बांधकामाच्या वेळी आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून सात्त्विक अत्तर, विभूती इत्यादींचा वापर करणे : घराचे बांधकाम चालू असतांना आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून आम्ही बांधकामाची वाळू, सिमेंट आणि खडी यांमध्ये सात्त्विक अत्तर अन् उदबत्तीची विभूती, तसेच छताच्या सेंटरिंगच्या वेळी त्यामध्ये ‘सनातन प्रभात’चे अंक, अत्तर आणि उदबत्तीची विभूती वापरली. आम्ही घराला बाहेरून रंगही संस्थेच्या आश्रमासारखा दिला.

६ आ. घराच्या व्यवहाराच्या वेळी एका वर्गणीदाराने आणि साधकाने स्वतःहून मध्यस्थी करून ठरलेल्या व्यवहारामध्ये काही सहस्र रुपये न्यून करायला लावून साहाय्य करणे : आम्ही सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतो; म्हणून गावातील बर्‍याच प्रतिष्ठित व्यक्ती आमच्या ओळखीच्या असल्या, तरी आम्ही एकाही व्यक्तीकडे कधीही स्वतःकरता साहाय्य मागितले नाही; परंतु आम्ही घेत असलेल्या घराच्या व्यवहाराच्या वेळी ‘पैसे अल्प करा. मध्यस्थी करा’, असे न सांगताही दौंड येथील एका वर्गणीदाराने स्वतःहून मध्यस्थाची भूमिका घेऊन आमच्या बाजूला उभे राहून ठरलेल्या व्यवहारामध्ये २५ सहस्र रुपये न्यून करायला लावले. त्याच व्यवहारामध्ये केडगाव येथील एका साधकाने आणखी १० सहस्र रुपये न्यून करायला लावले.

६ इ. साधक हिंदु धर्मासाठी निःस्वार्थपणे कार्य करत असल्याने लाद्यांच्या व्यापार्‍याने साधकाला अल्प दरात लाद्या देणे : आम्ही घराच्या लाद्यांमध्ये पालट करून बांधकाम व्यावसायिक (बिल्डर) देत असलेल्या लाद्यांपेक्षा किंमती लाद्या अल्प भावात आणल्या. त्यामुळे राग येऊन बांधकाम व्यावसायिक लाद्यांच्या व्यापार्‍याला म्हणाला, ‘‘मी त्यांच्यापेक्षा अधिक लाद्या घेतो, तरी मला (बिल्डरला) देत असलेल्या किंमतीपेक्षा यांना अल्प दरात लाद्या का दिल्या ?’’ तेव्हा लाद्यांच्या व्यापार्‍याने परखडपणे सांगितले, ‘‘तुम्ही (बिल्डर) हिंदु धर्मासाठी कार्य करत नसून ते हिंदु धर्मासाठी निःस्वार्थपणे कार्य करत आहेत; म्हणून त्यांना लाद्या दिल्या.’’ तसे पाहिले, तर आमचा त्या लाद्यांच्या व्यापार्‍याशी कोणताच संबंध नव्हता, तसेच ‘आम्ही हिंदु धर्माचे कार्य करतो; म्हणून आम्हाला सवलत द्या’, असे आम्ही लाद्यांच्या व्यापार्‍याला सांगितले नव्हते, तरीही केवळ गुरुकृपेमुळेच हे सर्व झाले.

६ ई. ‘हे आमचे घर नसून सनातनचा दौंड येथील आश्रम आहे’, असेच आम्ही सगळ्यांना सांगतो आणि हाच आमचा भाव आहे. त्यामुळे आम्ही घराचे नावही ‘गुरुकृपा’, असे ठेवले आहे.’

– श्री. संतोष चंदुरकर, दौंड, पुणे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक