Gau Sansad Manifesto : जो गायीला मानत नाही तो सनातनी हिंदु नाही !  

  • ज्योतिषपीठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांची स्पष्टोक्ती !  

  • प्रयागराज येथे आयोजित गो संसदेकडून २१ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध !

गो संसदेमध्ये उपस्थित संत

प्रयागराज (उत्तप्रदेश) – जो गायीला मानत नाही तो सनातनी हिंदू नाही, असे विधान ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांनी येथे केले. येथील माघ मेळ्याच्या सेक्टर ३ मधील त्यांच्या शिबिरात गो संसदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शंकराचार्य बोलत होते. या वेळी गो संसदेकडून २१ कलमी जाहीरनामा घोषित करण्यात आला. या गो संसदेमध्ये शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद, तसेच महामंडलेश्‍वर, संत, साधू आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गाय ही कोणत्याही एका धर्माची किंवा पंथाची वस्तू नाही ! – शंकराचार्य स्वामी सदानंद

शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी सदानंद म्हणाले की, गाय ही कोणत्याही एका धर्माची किंवा पंथाची वस्तू नाही, तर ती सर्वांसाठी आहे. जसे एक आई तिच्या सर्व मुलांसाठी करते, तसे ती संपूर्ण जगाचे समान आदराने पालनपोषण करते. त्यामुळे राजकारण आणि द्वेष यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना समवेत घेऊन संघटित होऊन ध्येय गाठावे लागेल. तरच गोरक्षणाचा संकल्प पूर्ण होईल.

उपस्थित हिंदू

गो संसदेतील घोषणापत्रातील काही सूत्रे

१. ‘राष्ट्रीय राम गो भक्त आयोगा’ची स्थापना

२. आगामी नवसंवत्सर ‘गौ संवत्सर’ म्हणून घोषित

३. केंद्र सरकारने गायीला पशूच्या श्रेणीतून कायदेशीररीत्या वगळून तिला माता म्हणून सन्मान द्यावा आणि स्वतंत्र गो मंत्रालय स्थापन करावे.

४. गाय आणि गायीची संतती हा विषय राज्यघटनेतील राज्य सूचीतून काढून केंद्रीय सूचीत अंतर्भूत करावा.

५. जो हिंदु गोमांस भक्षण करतो, गोहत्या करतो किंवा पशूवधगृहाच्या व्यवसायात गुंतलेला आहे, तो जोपर्यंत या गोष्टी थांबवत नाही आणि पश्‍चात्ताप करत नाही, तोपर्यंत सर्वसामान्य हिंदूंनी अशा लोकांच्या धार्मिक समारंभांना उपस्थित राहू नये किंवा त्यांना स्वतःचे म्हणून स्वीकारू नये. त्यांच्याशी कसलेही संबंध ठेवू नयेत. अशा लोकांची सूची सिद्ध करून त्यांना जाणीव करून दिली जाईल आणि आवश्यकता भासल्यास सर्वसामान्य हिंदूंना कळवण्यात येईल.