आळंदी (पुणे) येथील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली !

भाविकांनी वारंवार आवाज उठवूनही पवित्र इंद्रायणी नदीची स्वच्छता न होणे हे प्रशासनाला लज्जास्पद !

आळंदी (जिल्हा पुणे), १० फेब्रुवारी (वार्ता.) – इंद्रायणी नदीकाठच्या गावांतील मैलामिश्रित सांडपाणी, तसेच कारखान्यांतील रसायनयुक्त सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यावर फेस दिसून येतो. तशीच परिस्थिती १० फेब्रुवारी या दिवशीही दिसून आली. आळंदी येथील ‘सिद्धबेट’ जवळील बंधार्‍याखालील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात फेसाळलेले पाणी दिसून येत आहे. अशा स्थितीमध्ये श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येणारे भाविक पवित्र इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. त्याचे पाणी ‘तीर्थ’ म्हणून प्राशन करतात. त्यामुळे भाविकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त इंद्रायणी नदीच्या काठावर १० सहस्र विद्यार्थ्यांचा गीता पठणाचा कार्यक्रम होत आहे. त्यासाठी नदीकाठावर विद्यार्थ्यांना ‘रेड कार्पेट’ (बसण्यासाठी लाल रंगाचे कापड) अंथरले आहे. या कार्यक्रमासाठी नदी काठावरील घाट स्वच्छ करणे, सजावट आणि वृक्ष कुंड्यांनी परिसर हिरवागार करण्यात आला आहे. इंद्रायणी नदी प्रदूषित आहे. वारंवार निवेदन देणे, उपोषण करूनही राज्य सरकार केवळ आश्वासने देत आहे. कोणतीही ठोस कृती केली जात नाही, असा आळंदीतील नागरिकांचा संतप्त सूर आहे.

संपादकीय भूमिका

प्रशासन इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाची समस्या सोडवण्याविषयी संवेदनशीलता कधी दाखवणार ?