अध्यात्म म्हणजे काय ? त्याचा जीवनात उपयोग काय ?

प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

पाश्चिमात्य विचारवंतांनी ‘अध्यात्म’ शब्दाचा अर्थ सामान्यतः ‘मृतात्म्यासंबंधी’ किंवा ‘परलोकविद्या’ अशा प्रकारे केल्याचे दिसते. आपल्याकडे आध्यात्मिक शब्दाने ‘आत्मतत्त्वविषयक’ गोष्टींचा समावेश ‘अध्यात्म’ या संज्ञेत केला जातो. अभौतिक गोष्टींपासून जीव, तत्त्वज्ञान, ब्रह्मविद्येपर्यंतच्या सर्व संकल्पना ‘अध्यात्म’ या शब्दात गृहित धरल्या जातात.

प.पू. स्वामी वरदानंद भारती

१. परब्रह्मतत्त्व जीवभावाचा सहज भाव म्हणजे अध्यात्म !

श्रीमद्भगवद्गीतेच्या ८ व्या अध्यायाच्या प्रारंभी श्लोक ३ मध्ये अर्जुन जे प्रश्न विचारतो त्यामध्ये ‘किं अध्यात्म’ असा प्रश्न आहे. गीतेत त्याचे थोडक्यात उत्तर ‘स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।’, म्हणजे ‘आपले स्वरूप अर्थात् जीवात्मा अध्यात्म नावाने संबोधला जातो.’

‘ऐशिया आपुलियाची सहजस्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।
तया नाम सुभद्रापती । अध्यात्म गा ।।

– ज्ञानेश्वरी, अध्याय ८, ओवी १९

अर्थ : ‘अर्जुना, याप्रमाणे आपल्या सहज स्थितीने असणार्‍या ब्रह्माचे जे अखंडत्व, त्या अखंडत्वास अध्यात्म असे नाव आहे’, अशी संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी व्याख्या केली आहे. ‘परब्रह्मतत्त्व जीवभावाचा सहज भाव आहे’, याविषयीची सविस्तर चर्चा, त्याचे तत्त्वज्ञान, प्राप्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म !

२. अध्यात्म जीवनातील चढ-उतार, सुख-दुःख यांचा माणसाच्या समाधानावर परिणाम होऊ देत नाही !

या अध्यात्माचा जीवनात उपयोग हा अप्रगट आहे. माणसाच्या जीवनात चढ-उतार, लाभ-हानी, यश-अपयश, थोडक्यात सुख-दुःख यांचे द्वंद्व अखंडपणे चालत असते. त्याचे स्वाभाविक परिणाम हर्ष (मोह) आणि शोक यांमध्ये होतात. त्यामुळे माणसाचे जीवन असमाधानी बनते. दुःखाने माणसाचे समाधान न्यून होईल, यात आश्चर्य नाही; परंतु विचार केला, तर केवळ सुखाने माणूस समाधानी बनत नाही, हे लक्षात येईल. जसजसे सुख मिळत जाईल, तसतशी माणसाची आसक्ती, हाव वाढत जाते आणि परिणामी तो असमाधानी बनतो. स्वास्थ्य आणि आनंद घालवून बसतो. मनुष्य आपले सर्व व्यवहार करतो ते समाधानाच्या प्राप्तीकरता ! त्यालाच तो सुख समजत असतो. सार्वत्रिक अनुभव असा दिसतो की, मनुष्याला व्यवहारातून बरेच काही मिळते; पण समाधानच मिळत नाही.

अध्यात्मज्ञान सुख-दुःखांची परिणती ‘आसक्ती (हर्ष-मोह) आणि शोक’ यांमध्ये होऊ देत नाही. त्यामुळे माणसाची समाधानी अवस्था टिकून रहाते. अध्यात्मज्ञान जीवनाच्या सर्व दुःखांचे पर्यवसान शोकात होऊ देत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या वाहनाचे उत्तम असे आघातपाचक (शॉक ॲब्सॉर्बर्स) रस्त्याचा खडबडीतपणा आतील प्रवाशास जाणवू देत नाहीत, त्याप्रमाणे अध्यात्म जीवनातील चढ-उतार, सुख-दुःख यांचा माणसाच्या समाधानावर परिणाम होऊ देत नाही. तो एका दिव्य आनंदात आणि समाधानात राहू शकतो.’

– प.पू. स्वामी वरदानंद भारती

(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. वर्ष १९९८)