३० लाख हिंदूंनी घेतले श्री रामललाचे दर्शन : १५ कोटी रुपये अर्पण जमा !

सोन्या-चांदीच्या वस्तूंच्या रूपातही मोठ्या प्रमाणात देणगी !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – गेल्या महिन्यात श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर २३ जानेवारीपासून श्रीराममंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आले. पहिल्या १५ दिवसांत देशभरातील ३० लाखांहून अधिक रामभक्तांनी आराध्य श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. या कालावधीत मंदिरात जमा झालेले अर्पण मोजण्यात आले. मंदिरातील ६ दानपेट्या, तसेच परिसरातील १० पेट्या उघडण्यात आल्या. या पेट्यांतून, तसेच अन्य मार्गांन्वये एकूण १५ कोटी रुपये अर्पणाची रक्कम जमा झाली आहे.

१. पहिल्या १५ दिवसांत रामभक्तांच्या प्रचंड गर्दीमुळे अर्पण पेट्या उघडण्यात आल्या नव्हत्या. या पेट्यांतून मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिनेही मिळाले.

२. श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी सरासरी २ लाख भाविक येत आहेत.

३. ४ फेब्रुवारीच्या रात्री ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या कर्मचार्‍यांसह १५ सदस्यीय पथकाने सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या देखरेखीखाली ६ दानपेट्या उघडल्या आणि ठेवलेल्या वस्तू सुरक्षित ठेवल्या.

“देणग्यांचा हिशेब प्रतिदिन न्यासाच्या कार्यालयात जमा होतो ! – राममंदिर न्यास कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता”

मंदिर उघडल्यानंतर पहिल्या पंधरवड्यात विविध माध्यमांतून १५ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. भाविक थेट परमेश्‍वराला नैवेद्य दाखवत आहेत. मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या १० अर्पण पेट्यांच्या ठिकाणी न्यासाचे कर्मचारी तैनात आहेत. देणगी दिल्यावर पावतीही दिली जाते. देणग्यांचा हिशेब प्रतिदिन सायंकाळी न्यासाच्या कार्यालयात जमा केला जातो.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंच्या देवतांवर नाहक टीका करून त्यांचा बुद्धीभेद करू पहाणार्‍या पुरो(अधो)गाम्यांना ही चपराक आहे, असे म्हणायला हरकत नाही !
  • एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्पण गोळा होत असतांना ‘हा पैसा गरिबांमध्ये वाटा’ किंवा ‘हा पैसा विकासकामांना द्या’, असे कुणी म्हटल्यास हिंदूंनी त्याकडे दुर्लक्ष करावे !