मनाची शांती शोधून जीवनाचे सार्थक करण्याविषयी शिकवण देणारा गीता हा महान ग्रंथ आहे ! – आरिफ म. खान, राज्यपाल, केरळ

आळंदी (जिल्हा पुणे), ६ फेब्रुवारी (वार्ता.) – मनाची शांती शोधणे आणि ती प्राप्त करणे म्हणजेच जीवनाचे सार्थक होय. अशी शिकवण देणारी ‘श्रीमद्भगवद्गीता’ हा महान ग्रंथ आहे. ‘तो समाजाची धारणा करतो. ज्यांचे शांत, संयमी, आदर्शवत् चरित्र असते. जे लोकहिताची कामे करतात आणि वसंत ऋतूप्रमाणे अलगद विरून जातात, ते संत असतात’, असे आदि शंकराचार्य यांनी सांगितले आहे. संतांनी स्वत:वर विजय प्राप्त केलेला असतो. भवसागर पार केलेला असतो आणि भक्तांना जन्म-मृत्यूच्या भवसागरातून पार करतात ते संत असतात, असे मार्गदर्शन केरळचे राज्यपाल आरिफ म. खान यांनी केले.

६ फेब्रुवारी या दिवशी आळंदी येथे प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘गीताभक्ती अमृत महोत्सवा’त ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर पूज्य म.मं. गीता मनीषी श्री ज्ञानानंद महाराज, प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज, पू. डॉ. आचार्य श्री लोकेश मुनी महाराज उपस्थित होते.

आरिफ खान पुढे म्हणाले, ‘‘जन्माला येण्याचा उद्देश ज्ञानप्राप्ती करणे. ज्ञान हे आपली स्वत:ची ओळख करून देते. बहुविविधता आणि बहुअंगी आयामातून एकता ओळखते, एकात्मतेचा संदेश देते. भारतीय संस्कृतीने सर्वोच्च योगदानातून दिव्यत्वाची शिकवण मानवतावादातून दिली आणि मानवतावादातून दिव्यत्व कसे प्राप्त करायचे याचे सामर्थ्य देणारी संस्कृती आहे. तिचा सर्वांनी अंगिकार केला पाहिजे.’’

सर्व आध्यात्मिक स्थानांमध्ये आळंदी येथे सर्वाधिक ऊर्जा आहे !- प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज

प्रारंभी मार्गदर्शन करतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज म्हणाले, ‘‘गीता भक्ती महोत्सवातून मला अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा मिळत असल्यामुळे मी धन्य झालो आहे. मला पंच्याहत्तरीनिमित्त जन्मोत्सव साजरा करण्यात कोणताही रस नव्हता; मात्र अनेक संत आणि भक्त यांनी सांगितले की, हा महोत्सव आळंदी येथे साजरा केला जाईल. श्रीमद्भागवतकथा पठणाचा कार्यक्रम येथेच होईल. त्या वेळी मी असा महोत्सव साजरा करण्याला अनुमती दिली, कारण सर्व आध्यात्मिक स्थानांमध्ये आळंदी येथे सर्वाधिक ऊर्जा आहे. गीता परिवाराच्या वतीने मुलांना गीता पठणासमवेत गीता प्रत्यक्षात कृतीत आणण्याविषयीही प्रयत्न केले जात आहेत.’’