आगामी निवडणुकीत गद्दारांना पुन्हा निवडून देऊ नका ! – उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे उत्साहात स्वागत

उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र

सावंतवाडी : मोदीजी आम्ही तुमचे शत्रू नव्हतो आणि आजही नाही. शिवसेना तुमच्यासमवेत होती. नंतर तुम्ही आम्हाला दूर केले. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही आणि सोडू शकत नाही. भगवा झेंडा आमचा कायम आहे; मात्र या भगव्या झेंड्यात फूट पाडण्याचे काम भाजप करत आहे. गेल्या १० वर्षांत देशाचे काम केले असते, तर तुम्हाला फोडाफोडीचे राजकारण करावे लागले नसते. कारण नसतांना विरोधी पक्षांना संपवण्याच्या प्रयत्नांत भाजप संपत चालला आहे. सध्या देशात हुकूमशाही चालू आहे. ही आपल्याला आगामी निवडणुकीत मोडून काढायची आहे. आगामी निवडणुकीत गद्दारांचा पराभव करा. त्यांना पुन्हा निवडून देऊ नका, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

‘जनसंवाद यात्रे’च्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री ठाकरे ४ फेब्रवारी या दिवशी जिल्हा दौर्‍यावर आले होते. मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ‘शिवराजेश्वर’ मंदिरातील सिंहासनाचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार भास्कर जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाकरे यांच्या या दौर्‍यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

(सौजन्य : TV9 Marathi)

या वेळी ठाकरे पुढे म्हणाले,

१. ‘वापरा आणि फेका’ ही भाजपची नीती आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान, वसुंधराराजे आणि देवेंद्र फडणवीस यांनाही अशीच वागणूक दिली आहे. आता भाजपमध्ये हुकूमशाही चालू आहे. ही हुकूमशाही मोडून काढायची आहे.

२. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे नाव न घेता ठाकरे म्हणाले, ‘‘माणूस चांगला दिसला म्हणून शिवसेनेत प्रवेश दिला; मात्र रक्तातच गद्दारी असल्याने यांच्या कुटुंबियांवर बसलेला गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही.’’

३. निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाहीत. निवडणुकांच्या वेळी मी पुन्हा येणार आहे. त्या वेळी केवळ प्रचाराला नाही, तर नंतर विजयाच्या सभेलाही येणार आहे.

४. जिल्ह्यात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, गोवेकर यांचे काय झाले ? याचा अजूनही पत्ता लागला नाही. जिल्ह्यात तेव्हा गुंडगिरी आणि घराणेशाही चालू होती, ती येथील जनतेने ठेचून काढली, अन्यथा आताही ती चालू राहिली असती.

५. माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरले; पण माझे कार्यकर्ते आहेत तेथेच आहेत. कार्यकर्त्यांचे हे कवच मला वडिलोपार्जित मिळाले आहे आणि त्यामुळे मी लढत आहे आणि लढत रहाणार. तुम्ही काही केले, तरी शिवसेना संपणार नाही. माझी शिवसेना आहे तेथेच आहे.

६. पंतप्रधान मोदी मालवणमध्ये आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला; मात्र किल्ल्यावरील मंदिरात जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतले नाहीत, असे ठाकरे यांनी सांगितले.

७. किल्ल्यावरील मंदिरात आमदार वैभव नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नवीन सिंहासन केले, असे सांगत आमदार नाईक यांचे कौतुक केले.

सत्ताधार्‍यांमध्येच गँगवॉर, महाराष्ट्रात प्रथमच घडले !

कल्याण येथे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, गोळीबार करण्याची वेळ त्यांच्यावर का आली ? याची चौकशी होणार का ? सत्ताधार्‍यांमध्ये गँगवॉर होण्याची महाराष्ट्रातील प्रथमच घटना आहे.’’

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कुडाळमधील परिस्थिती नियंत्रणात

उद्धव ठाकरे यांचे कुडाळ येथे आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांनी दुचाकी फेरी काढत त्यांचे स्वागत केले. घोषणाबाजी करत ही फेरी शहरातील भाजप कार्यालयाकडे आली असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यास प्रारंभ केला. यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले; मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.