सातारा जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत् करणार ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उपक्रमां’तर्गत जिल्ह्यातील ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत् करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी येथे केले.

जिल्हाधिकारी डुडी पुढे म्हणाले की, आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे, असे भारतीय संस्कृती सांगते. या विचाराशी बांधील राहून गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचा निश्चय जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आला आहे. भविष्यात सातारा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जनतेला उच्च प्रतीच्या आरोग्य सेवा पुरवण्याचा मानस ठेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यानुसार अद्ययावत् वैद्यकीय साहित्य, बाह्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंतर, प्रसूतीगृह आणि शस्त्रक्रियागृह हे प्रमुख विभाग आहेत. या विभागांसाठी अत्याधुनिक साहित्य विकत घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व सेवांचे संगणकीकरण, अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. आधुनिक वैद्यांना, मदतनिसांना तांत्रिक आणि प्रशासकीय कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच बांधकाम, परिसर सुशोभिकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, हिरकणी कक्ष, प्रसाधनगृह, निवासस्थाने, औषधगृह, शस्त्रक्रियागृह, संगणक कक्ष यांचे अद्ययावतीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.