पुणे येथील शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात सापडल्या वापरलेल्या सिरींज आणि निरोध !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – भवानी पेठेतील ‘वीर लहुजी वस्ताद साळवे, क्रमांक ८६ ब’ या शाळेत वापरलेले सिरींज आणि निरोध काही वर्ग खोल्या अन् मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सिरींज आणि निरोध आले कुठून ? असा प्रश्न संतप्त पालकांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी उपस्थित केला आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असल्याने याची चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.

पालक विजय मोहिते यांनी सांगितले की, शाळेत सुरक्षारक्षक असतांनाही असा प्रकार कसा घडू शकतो ? या प्रकारामुळे आमच्या मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. तसेच शाळेत शिक्षकच नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेत अनुपस्थित असतात. उपस्थित विद्यार्थीही मस्ती करण्यात दंग असतात. याचा सर्व परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन योग्य ती कारवाई करावी. या संदर्भात भवानी पेठ विभागातील प्रभारी साहाय्यक प्रशासकीय अधिकारी शरद मेमाणे म्हणाले की, याविषयी शाळेला नोटीस बजावण्यात आली आहे. शाळेतील सीसीटीव्ही चित्रण पडताळून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका :

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यासारख्या ठिकाणी शाळेत निरोध सापडणे, हे लज्जास्पद आहे. या प्रकाराची गंभीर नोंद घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी !