मुंबई – व्हॉट्सॲपवर प्रभु श्रीरामाचे आक्षेपार्ह चित्र असलेले स्टेटस ठेवल्याप्रकरणी मुंबईत शिक्षण घेत असलेल्या एका मागासवर्गीय विद्यार्थ्याला २ दिवस अटक करून पोलीस ठाण्यात ठेवले होते. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. हा देवनार येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स’चा हा विद्यार्थी असून मूळचा लातूरचा आहे. त्याची ओळख लपवून ठेवण्यात आली आहे. हिंदूंच्या भावना दुखावल्याप्रकरणी एका विद्यार्थ्याची तक्रार आल्यानंतर एफ्.आय.आर्. नोंदवण्यात आला होता.
या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या संचालकांना पाठवलेल्या गोपनीय पत्रात भगवे झेंडे आणि प्रभु श्रीरामाचे पोस्टर्स कॅम्पसमधून उतरवण्यास सांगितले होते. हा सर्व ‘राजकीय अजेंड्या’चा भाग असल्याचे या गटाचे म्हणणे होते. या विद्यार्थ्याला अटक करण्यात आल्यानंतर संबंधित गटाने भावना दुखावल्याविषयी क्षमा मागितली.
या विद्यार्थ्याला कलम १५३-अ (धर्म, वंश इत्यादींच्या आधारावर विविध गटांमध्ये शत्रूत्व वाढवणे) आणि २९५ अ (जाणूनबुजून आणि द्वेषपूर्ण कृत्ये, कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करून त्यानंतर धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू असलेल्या) अंतर्गत अटक करण्यात आली होती.