पूना हॉस्पिटल बाँबने उडवून देण्याची खोटी धमकी !

धमकी देणार्‍याचा शोध चालू

पुणे – पोलीस नियंत्रण कक्षातील ‘व्हॉट्सॲप’वर रात्री साडेअकरा वाजता पाकिस्तानच्या क्रमांकावरून एक संदेश आला. ‘पाकिस्तानी कैदीयोंको छोड दो, वरना पूना हॉस्पिटल को बाँबसे उडा देंगे’ असा तो संदेश होता. नवी पेठ येथील ‘पूना हॉस्पिटल’मध्ये बाँब ठेवल्याची धमकी देणारा तो संदेश होता. त्यानंतर १ फेब्रुवारीला मध्यरात्री पोलिसांनी रुग्णालयाची पहाणी केली. तेव्हा बाँबसदृश कोणतीही वस्तू सापडली नाही. ही माहिती विश्रामबाग पोलीस, तसेच बाँबशोधक पथकाला देण्यात आली. खोडसाळपणे पोलीस नियंत्रण कक्षाला संदेश केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस नियंत्रण कक्षाला संदेश पाठवणार्‍या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे तेथे बघ्यांची मोठी गर्दी निर्माण झाली होती. रहदारीसाठी शास्त्री रस्ता आणि कर्वे रस्त्याला जोडणारा यशवंतराव चव्हाण पूल बंद करण्यात आला होता. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता.

संपादकीय भूमिका :

असे प्रकार वारंवार घडत आहेत. संबंधितांना अटक करून कठोर शिक्षा केल्याविना इतरांवर जरब बसणार नाही !