लग्नविधींचे महत्त्व !

लग्नविधी हा धार्मिक असून त्याचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. याविषयी सध्या बहुतांश जण अनभिज्ञच असतात. विधींमध्ये चेष्टामस्करी करणे, काहीतरी आधुनिक गोष्टी करणे, असे केले जाते. लग्नविधींसाठी श्री गणपति आणि अन्य देवता यांना आवाहन करून त्या ठिकाणी त्यांचे विधीवत् पूजन केले जाते. याचा अर्थ ज्याच्या त्याच्या भावाप्रमाणे देवता तिथे सूक्ष्म रूपाने येतात. त्या देवतांचे वधू-वरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी आशीर्वाद प्राप्त होतात. आपल्या विधींतील श्‍लोकांचा अर्थ अंतर्मुख करणारा आणि सुखी जीवनाची दृष्टी देणारा आहे. विवाह विधींच्या वेळी तो समजून घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्याचा निश्‍चय करणे, हे अपेक्षित आहे.

सध्या लग्नात विधी एकीकडे चालू असतात आणि काही मोजकीच मंडळी, विशेष करून वयस्कर वर्ग विधींकडे पहात असतो आणि तरुणवर्ग मात्र ‘सेल्फी’ (स्वतःची छायाचित्रे स्वतःच काढणे) काढण्यात, मौजमजा करण्यात मग्न असतो. हे सर्वच चुकीचे आहे, असे नाही; पण लग्नातील विधी चालू असतांना त्यांचा अर्थ समजून घेणे, तसे का करायला सांगितले आहे ? त्याचे महत्त्व समजून घेणे, त्यातील आनंद घेणे याकडे कुणाचाही कल दिसत नाही. सध्या काही गुरुजींकडूनही विवाहातील धार्मिक विधी शास्त्रशुद्ध करण्यात जुळवाजुळव (अ‍ॅडजेस्टमेंट) केली जाते.

विवाहाचा खरा उद्देश ‘दोन जिवांचे भावी जीवन एकमेकांना पूरक अन् सुखी होणे’ आणि ‘ईश्‍वराचा आशीर्वाद प्राप्त करून घेणे’, हा असल्याने यासाठी विवाहविधी धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणेच करणे अत्यावश्यक असते. त्या विधींचा अर्थ समजून घेण्यासाठी गुरुजींनी ध्वनीवर्धकावर विधींचा अर्थ सांगितला, तर सर्वांनाच त्यात सहभागी होता येईल आणि तो विवाहविधी अनुभवता येईल. त्याची परंपरा पुढे चालू रहाण्यास गती मिळेल. हिंदु धर्मात सांगितलेल्या १६ संस्कारांपैकी ‘विवाहसंस्कार’ हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. विवाहाचे पालटते स्वरूप बघता विधींचे महत्त्व लक्षात न आल्याने विधी म्हणजे लग्नात करायचा एक सोपस्कार झाला आहे. सध्या त्याला पाश्‍चात्त्यांप्रमाणे एका कार्यक्रमाचे (‘इव्हेंट’चे) रूप आले आहे. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण झाल्याने महागड्या लग्नपत्रिका, उंची वेशभूषा, दागदागिने, महागडे कार्यालय, ‘बँड’, आतषबाजी, कर्णकर्कश संगीत, झगमगाट, अनेक पदार्थ असलेल्या जेवणाचा थाटमाट, नवरदेवाचे बूट लपवणे, नवरा-नवरीला हार घालतांना त्यांना उचलणे आदी कुप्रथा, मेंदी, हळद यांसारखे वेगवेगळे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करणे इत्यादी गोष्टी असलेला विवाह म्हणजे ‘चांगला विवाह’, अशी चुकीची धारणा सध्या समाजात निर्माण होत चालली आहे. यापेक्षा विधींना महत्त्व दिल्यास विवाहाचा सर्वांनाच खरा लाभ होईल !

– सौ. प्रज्ञा जोशी, पनवेल.