हरिद्वारप्रमाणे गंगा महाआरतीच्या करण्याचा संकल्प !
नाशिक – हरिद्वार येथे होणार्या गंगा महाआरतीच्या धर्तीवर येथे गोदावरीची नियमित आरती चालू करण्याचे प्रयत्न आहेत. प्रतिदिन गोदावरीची आरती होतेच; मात्र मोठ्या स्वरूपासाठी शासकीय पातळीवरही आता प्रयत्न होत असून सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार येथे आल्यावर त्यांनी पहिल्या टप्प्यात यासाठी १० कोटी रुपये मान्य केले आहेत. निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे आता १६ फेब्रुवारी या ‘गोदाजन्मोत्सव’ दिनापासून नाशिककरांसह भाविकांना पारंपरिक गोदा आरतीसह इतर काही श्लोक आणि अन्य आरत्याही नव्या सुरात ऐकायला मिळणार आहेत.
१२ जानेवारी या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी पूजन केल्यापासून तेथे स्नान आणि दर्शन यांसाठी भाविकांची गर्दी होत आहे. सिंहस्थ कालावधीत नियमित छोटेखानी स्वरूपात आरती केली गेली. संघाच्या वतीनेही आरती करण्यात येते; मात्र वाराणसी, हरिद्वारच्या धर्तीवर गोदावरीची भव्यदिव्य महाआरती व्हावी, यासाठी पुन्हा प्रयत्न चालू झाले आहेत. त्यासाठी ‘आरतीसेवा संघा’ची स्थापना करण्यात आली आहे.