पुणे – म. गांधी यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या विरोधात कोणताही दखलपात्र गुन्हा लागू होत नसला, तरी न्यायालयात केलेली खासगी तक्रार नोंद करून घेणे योग्य आहे, असा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलोक पांडे यांनी दिला आहे. त्याअन्वये पू. भिडेगुरुजी यांच्या विरोधात फौजदारी तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणाचे अन्वेषण करून कलम १५३ ए यांसह विविध कलमांतर्गत भिडेगुरुजी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी तक्रारीमधून करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने या प्रकरणी दखलपात्र गुन्हा लागू होत नसल्याचे सांगून गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला.
म. गांधी यांच्या संदर्भात केलेली टीका व्यक्तिगत होती, समाजाच्या विरोधात केलेली नव्हती, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात अपील करणार असल्याची माहिती अधिवक्ता असीम सरोदे यांनी दिली. या प्रकरणी तक्रारदारांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०० अन्वये न्यायालयात बोलवून अन्वेषण करण्यास न्यायालयाने संमती दिली आहे. त्यामुळे त्यांचा जबाब २९ जानेवारीला घेतला जाईल, असे आदेशात म्हटले आहे.