Emmanuel Macron Chief Guest RepublicDayParade : राजधानीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेड कार्यक्रमात आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख पाहुणे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

नवी देहली – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारताच्या २ दिवसांच्या दौर्‍यावर आले आहेत. ते थेट जयपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार असून तेथील काही कार्यक्रम आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे स्वागत करतील. जयपूरमध्येच दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. या द्विपक्षीय बैठकीत इस्रायल-हमास युद्ध, लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची आक्रमणे, तसेच उभय देशांमधील संरक्षण भागीदारी आणि ‘युरोपियन युनियन व्यापार करार’ यांवर चर्चा होऊ शकते.

पुढे २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. मॅक्रॉन हे भारतातील प्रजासत्ताक दिन परेडचे प्रमुख पाहुणे होणारे फ्रान्सचे सहावे राष्ट्राध्यक्ष असून राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्यांची ही तिसरी भारतभेट आहे.

जुलै २०२३ मध्ये पंतप्रधान मोदी फ्रान्सच्या ‘बॅस्टिल डे परेड’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यानंतर ते दुसरेच पंतप्रधान ठरले.