सर्वार्थाने आदर्श श्रीराम !

श्रीराम

१. आदर्श पुत्र : रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने दुःख करू नका’ असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला १४ वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर राम नमस्कार करतो आणि पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलतो.

२. आदर्श बंधू – अजूनही आदर्श अशा बंधुप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.

३. आदर्श पती : श्रीराम एकपत्नीव्रती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्नीची आवश्यकता असतांना दुसरी पत्नी न करता त्याने सीतेची प्रतिकृति आपल्याशेजारी बसवली. यावरून श्रीरामाचा एकपत्नी बाणा दिसून येतो. त्या काळी राजाने बर्‍याच राण्या करण्याची प्रथा होती. या पार्श्वभूमीवर श्रीरामाचे एकपत्नीव्रत प्रकर्षाने जाणवते.

४. आदर्श मित्र – रामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात साहाय्य केली.

५. आदर्श राजा

५ अ. राजधर्माचे पालन करण्यात तत्पर : प्रजेने सीतेविषयी संशय व्यक्त केल्यावर त्याने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. याविषयी कालिदासाने कौलिनभीतेन गृहन्निरस्ता न तेन वैदेहसुता मनस्तः ।’ (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालवले, मनातून नाही.) असा मार्मिक श्लोक लिहिला आहे.

६. आदर्श शत्रू : रावणाच्या मृत्यूनंतर अग्नीसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणासमवेत वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’

(संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘श्रीराम’)