पुणे येथे रुग्णवाहिकेतून गांजाची विक्री करणार्‍या टोळीस अटक !

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई !

अंमली पदार्थांचा साठा (प्रतिकात्मक चित्र)

पुणे – येथे रुग्णवाहिकेतून गांजाची विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गांजा विक्री प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. २ वेगवेगळ्या कारवायांमध्ये पथकाने ९६ किलो गांजासह १ कोटी ३१ लाख ५५ सहस्र ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी रावेत येथील म्हस्के वस्तीत बी.आर्.टी. रस्त्यावरून कृष्णा शिंदे, अक्षय मोरे, हनुमंत कदम यांना कह्यात घेतले. या तिघांकडून २५ लाख ६९ सहस्र १०० रुपये किमतीचा २५ किलो ६९१ ग्रॅम गांजा, १ चारचाकी, भ्रमणभाष आणि रोख रक्कम असा ३० लाख ५५ सहस्र ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला. तिघांनी हा गांजा देवीप्रसाद याच्याकडून आणला असून तो गांजा सौरव निर्मल याला विकणार होते. त्यानुसार पोलिसांनी देवीप्रसाद याला उंडेगाव येथून कह्यात घेतले. संशयित हे रुग्णवाहिकेतून गांजाची वाहतूक करत होते. त्या २ रुग्णवाहिका पोलिसांनी कह्यात घेतल्या आहेत. देवीप्रसाद याच्याकडून ५० लाख २० सहस्र रुपयांचा ५० किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला.

संपादकीय भूमिका :

लाखो रुपयांच्या गांजाची रुग्णवाहिकेतून राजरोसपणे वाहतूक होणे गंभीर आणि चिंताजनक आहे ! एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्री होत असेल, तर किती तरुण व्यसनाच्या आहारी जात असतील याचा विचारही करू शकत नाही. प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना काढणे आवश्यक !