पिंपरी (जिल्हा पुणे) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांची एकत्र वेळ मिळत नसल्याने अनेक कोट्यवधी रुपयांची विकासकामे रखडली आहेत. महापालिकेच्या ५६६ कोटी ६५ लाख रुपयांच्या विविध १५ प्रकल्पांचे उद्घाटन आणि ४७८ कोटी ७४ लाख रुपयांच्या ४ प्रकल्पांचे भूमीपूजन यामुळे रखडले आहे. मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन करायचे या अट्टाहासापायी अनुमाने १ सहस्र ४५ कोटी ३९ लाख रुपयांची विकासकामे अद्याप चालू करण्यात आली नाहीत.
रखडलेले प्रकल्प !
शहरातील १८ मीटरपुढील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करणारी १६ लहान-मोठी यंत्रे धूळ खात पडून आहेत. दिव्यांग आणि मतिमंद यांच्यासाठीचे कल्याणकारी केंद्र, शाळा इमारत, वाय.सी.एम्.मधील विद्यार्थ्यांसाठीचे निवासस्थान इमारत, भोसरीतील लाईट हाऊस, भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक ४५ मीटर रस्त्यावरील रेल्वे रुळावरील उड्डाणपूल, जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट प्रकल्प, घरगुती घातक कचराप्रक्रिया या प्रकल्पांची उद्घाटने रखडली आहेत, तर मोशीतील गायरान भूमीवर ३४० कोटी रुपयांच्या रुग्णालय उभारणीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून केवळ भूमीपूजनाअभावी काम चालू होत नाही. ताथवडे येथे मैला शुद्धीकरण प्रकल्प बांधणे, वाकडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘बॅडमिंटन कोर्ट’ बांधणे या कामांचे भूमीपूजन रखडले आहे.