छत्रपती संभाजीनगर येथील घटना
छत्रपती संभाजीनगर – घाटी रुग्णालयात ११ जानेवारी या दिवशी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास २ गटांत झालेल्या हाणामारीत महिला आधुनिक वैद्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारण्यात आला. त्यामुळे त्यांचे डोके फुटले. या प्रकरणी घाटी प्रशासनाने रुग्णासह त्यांच्यासमवेत आलेल्यांविरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
या २ गटांमध्ये घाटी रुग्णालयाबाहेर हाणामारी झाली होती. एका गटातील घायाळ शेख सय्यद शेख समशेर, शेख शकील शेख समशेर हे उपचारांसाठी घाटी रुग्णालयातील अपघात विभागात आले होते. घायाळ झालेल्यांवर उपचार चालू असतांनाच पुन्हा ८ ते १० जणांच्या टोळक्याने घाटीत येऊन पुन्हा मारहाण चालू केली. यातील एका तरुणाने रुग्णाला रॉडने मारहाण केली. त्या वेळी त्याच्या हातातील रॉडचा फटका बसल्याने महिला निवासी आधुनिक वैद्य घायाळ झाल्या. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
आधुनिक वैद्यांनी काम बंद आंदोलन केले !
अपघात विभागात आधुनिक वैद्य आणि काही कर्मचारी यांना टोळक्याने धक्काबुक्की केली. त्यामुळे अपघात विभागातील निवासी आधुनिक वैद्यांनी ‘काम बंद’ करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे तातडीने अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी मध्यस्थी करत संबंधित दोषींवर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आधुनिक वैद्यांच्या मार्ड संघटनेने आंदोलन मागे घेत आरोग्यसेवा सुरळीत केली.
४ सैनिकांच्या हकालपट्टीचे आदेश !
हाणामारीची घटना चालू असतांना एम्.एस्.एफ्. सैनिकांनी मध्यस्थी केली नाही. त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीचे आदेश देण्यात आले आहेत. यापुढे सैनिकांना सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत. अपघात विभागासमोरचा दरवाजा बंद करून तातडीच्या रुग्णांनाच प्रवेश दिला जाईल, असे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकानागरिक, आधुनिक वैद्य कुणीही सुरक्षित नाहीत, हेच यातून लक्षात येते. हे पोलिसांचा धाक संपल्याचे लक्षण आहे ! |