छत्रपती संभाजीनगर – थेट परीक्षा केंद्रात उत्तरपत्रिका मिळवा आणि १० लाखांत तलाठी व्हा, असे आमीष उमेदवारांना दाखवले जात आहे. या सर्व घटना समोर येऊनही शासन गंभीर नाही, असे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, पेपरफुटीच्या जाळ्यात टी.सी.एस्. आस्थापनाचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याची माहिती पुढे येत आहे. टी.सी.एस्.ने ‘आऊटसोर्स’ केलेल्या खासगी केंद्रावर १९ हून अधिक गुन्हे गेल्या वर्षभरात राज्यभर नोंद झाले आहेत. सर्व गुन्ह्यांमध्ये किमान ९ आरोपी समान आहेत आणि त्यांची गुन्हे करण्याची पद्धत सारखीच आहे. परीक्षेत उत्तरे पुरवण्यासाठी ३ लाख रुपये घेतले जातात. तळपायाला ‘चिप’ लावून छुप्या छायाचित्रकाचा वापर करून प्रश्नपत्रिका ‘स्कॅन’ केली जाते. हे सगळे प्रकार समोर आले आहेत.
वडेट्टीवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे की, परीक्षा घोटाळ्यांवर सरकारने श्वेतपत्रिका काढावी, तसेच सर्व परीक्षा एम्.पी.एस्.सी.च्या वतीने घेण्यात यावी.
संपादकीय भूमिका :राज्यातील परीक्षांच्या पेपरफुटीच्या प्रकरणी उत्तरदायींना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |